सोमवारी बहुतांश एटीएम केंद्रे राहिली बंद
By Admin | Updated: May 6, 2015 00:58 IST2015-05-06T00:58:47+5:302015-05-06T00:58:47+5:30
एटीएममधील खडखडाटाने ग्राहकांची तारांबळ.

सोमवारी बहुतांश एटीएम केंद्रे राहिली बंद
अकोला : शहरातील जवळपास सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांच्या एटीएममध्ये गेल्या तीन दिवसांपासून ठणठणाट होता. तोच प्रत्यय चौथ्या दिवशी सोमवारीही आल्याने ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला. ग्राहकांच्या संतप्त भावनांची बँक प्रशासनाकडून दखल घेतली न गेल्याने २४ तास सेवेचा विसर पडला की काय, असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत होता. १ मे रोजी आलेली सुट्टी शनिवारचा हाफ डे व त्याला रविवार लागून आल्याने बँकाही बंद होत्या. ४ रोजी बुद्ध पौर्णिमेची सुट्टी आल्याने सलग चार दिवसांपासून बंद राहिलेल्या बँकांपाठोपाठ एटीएममध्येही खडखडाट असल्याने ग्राहकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. एटीएममधील रोकड संपल्यानंतरही ती टाकण्याची तसदी या सुट्यांचा कालावधी पाहता घेण्यात न आल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. टॉवर चौकातील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत एकाच ठिकाणी असलेल्या पाच-सहा एटीमसह इन्कम टॅक्स, तुकाराम चौक, रिंग रोड, कौलखेड, रतनलाल प्लॉट, जठारपेठ, रेल्वे स्थानक, आकोट फैल, टिळक रोड, जिल्हाधिकारी कार्यालय चौक, लक्झरी बस स्थानक, हरिहरपेठ आणि जुने शहरातील जवळपास सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांचे एटीएम सोमवारी बंद दिसून आले. या परिस्थितीमुळे शहरात मोजक्याच ठिकाणी असलेल्या खासगी बँकांच्या एटीएमवर भार वाढला. रोकड संपल्याने तीदेखील काही काळ बंद होती. सोमवारी अनेक बँकांच्या एटीएमला शटर लावण्यात आल्याचे चित्र दिसून आले.