डासांचा उच्छाद; धुरळणीला ‘खो’
By Admin | Updated: September 1, 2014 01:45 IST2014-09-01T01:43:21+5:302014-09-01T01:45:05+5:30
अकोला शहरात डासांच्या उच्छादामुळे हिवतापासह विविध आजारांचा फैलाव; महापालिकेचा हिवताप विभाग मात्र अद्यापही झोपेत.

डासांचा उच्छाद; धुरळणीला ‘खो’
अकोला : शहरात डासांच्या उच्छादामुळे हिवतापासह विविध आजारांचा फैलाव होत असताना, महापालिकेचा हिवताप विभाग अद्यापही झोपेत आहे. नगरसेवकांच्या उदासीनपणामुळे प्रभागात धुरळणी व फवारणीला ह्यखोह्ण देण्यात आला असला तरी नादुरुस्त २८ फॉगिंग मशीनच्या खर्चापोटी अनुदान उकळण्याचा कार्यक्रम बिनदिक्कतपणे सुरू असल्याची माहिती आहे.
शहरात ठिकठिकाणी नाले-गटार घाणीने तुंबली आहेत. प्रभागातील अंतर्गत रस्त्यांसह सर्व्हिस लाईनमध्ये गाजर गवत, काटेरी झुडुपे वाढल्यामुळे डासांची मोठय़ा प्रमाणावर उत्पत्ती झाली आहे. डासांमुळे शहरातील बच्चे कंपनीसह वयोवृद्ध नागरिक विविध आजारांनी त्रस्त झाले असतानाच महापालिका प्रशासन व हिवताप विभाग कुंभकर्णी झोपेत आहे. डासांच्या उत्पत्तीला आळा घालण्यासाठी धुरळणी व फवारणीसाठी मनपाकडे ३0 फॉगिंग मशीन होत्या. प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फायदा घेत, हिवताप विभागाने मनमानी सुरू केल्याचे चित्र आहे. हिवताप विभागाकडे असलेल्या ३0 मशीनपैकी केवळ दोन मशीन दुरुस्त असून, उर्वरित २८ मशीन नादुरुस्त असल्याची माहिती आहे. यातही प्रशासनाला अंधारात ठेवून नादुरुस्त मशीनच्या खर्चापोटी तीन वर्षांपासून अनुदान उकळण्यात आले. या प्रकरणाची कर्तव्यदक्ष आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सखोल चौकशी करण्याची गरज आहे.