बाबासाहेबांच्या स्मारकासाठी अकोल्यातून गेली होती ९ रुपयांची मनिऑर्डर!
By Admin | Updated: April 14, 2015 00:14 IST2015-04-14T00:14:36+5:302015-04-14T00:14:36+5:30
हातरूणच्या तुकाराम डोंगरेंची अशीही भीमनिष्ठा.

बाबासाहेबांच्या स्मारकासाठी अकोल्यातून गेली होती ९ रुपयांची मनिऑर्डर!
अकोला- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत योगदान देणार्या भीमसैनिकांची मोठी संख्या जिल्ह्यात आहे. त्यापैकीच एक असलेल्या तुकाराम डोंगरे यांनी १९६४ मध्ये बाबासाहेबांच्या स्मारकासाठी हातरूणसारख्या छोट्याशा गावातून त्यावेळी ९ रुपयांची मनिऑर्डर पाठविली होती. बाबासाहेबांच्या जयंती निमित्ताने या आठवणीला उजाळा मिळाला आहे. बाळापूर तालुक्यात असलेल्या हातरूण येथे राहणारे तुकाराम गोंदाजी डोंगरे यांनी मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सभा प्रत्यक्ष बघितली होती. शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या काळापासून ते आंबेडकरी चळवळीत एकनिष्ठेने कार्यरत आहेत. १९६४ मध्ये चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या स्मारकासाठी देशभरातून आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला होता. त्यावेळी हातरूण येथून डोंगरे यांनी ९ रुपयांची मनिऑर्डर पाठविली होती. ही मनिऑर्डर ७ मे १९६४ रोजी भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने भैयासाहेब ऊर्फ यशवंतराव आंबेडकर यांनी स्वीकारली होती. त्यांच्या स्वाक्षरीची पोचपावती आणि मनिऑर्डरची प्रत आजही डोंगरे यांनी जपून ठेवली आहे. कौटूबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची अस तानादेखील बाबासाहेबांच्या स्मारकासाठी त्याकाळी स्वकमाईतून ९ रुपये देण्याचे औदार्य डोंगरे यांनी दाखविले होते. केवळ बाबासाहेबांवरील निष्ठेमुळेच त्यांनी पोटाला चिमटा घेऊन बाबासाहेबांचे स्मारक उभे रहावे म्हणून खारीचा वाटा उचलला होता.
*बाबासाहेबांनी दिली होती प्रबुध्द भारतची पावती !
बाबासाहेबांच्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या काळापासून आंबेडकरी चळवळीत एकनिष्ठेने कार्यरत तुकाराम डोंगरे हे ह्य प्रबुद्ध भारतह्णचे वार्षिक वर्गणीदार होते. त्यांना बाबासाहेबांनीच प्रत्यक्ष प्रबुद्ध भारत सभासद वर्गणीची पोच दिली होती. डोंगरे यांनी हा अनमोल ठेवा आजही जपून ठेवला आहे.