मान्सूनच्या परतीची चाहूल !

By Admin | Updated: September 4, 2015 00:03 IST2015-09-04T00:03:10+5:302015-09-04T00:03:10+5:30

राज्यात सरासरीच्या ५७ टक्केच पाऊस; ४९ टक्के पाणीसाठा.

Monsoon returns! | मान्सूनच्या परतीची चाहूल !

मान्सूनच्या परतीची चाहूल !

राजरत्न सिरसाट/अकोला : यावर्षी सरासरीपेक्षा कमी बरसणार्‍या मान्सूनची परतीच्या दिशेने वाटचाल सुरू होण्याची चिन्हे असून, येत्या दोन-चार दिवसात राजस्थानातून हा मान्सून परत निघणार असल्याचा अंदाज आहे. यावर्षी सरासरीपेक्षा खूपच कमी झालेल्या पावसाने राज्यातील पीक, पाण्याची स्थिती गंभीर बनली आहे. राज्यात आतापर्यंत सरासरीच्या ५७ टक्केच पाऊस झाल्याने सर्व धरणात केवळ ४९ टक्के जलसाठा आहे. अंदमान निकोबार बेटे, केरळ, गोवा, कोकण या राज्यात प्रवेश करणारा मान्सून सर्वात शेवटी १५ जुलैपर्यंत राजस्थानात पोहोचतो आणि १ सप्टेबरनंतर राजस्थानातूनच त्याचा परतीचा प्रवास सुरू होतो. यावर्षी १ सप्टेंबरला मान्सूनच्या परतीला सुरुवात झाली नाही; पण येत्या दोन-चार दिवसांत त्याचा माघारीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे. राजस्थान भागात कोरडे हवामान अद्याप तयार झाले नसल्याने १ सप्टेंबरला परतणार्‍या पावसाचा सध्यातरी मुक्काम आहे. महाराष्ट्रातून दरवर्षीप्रमाणे १५ सप्टेंबरनंतर मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाकडून वर्तविली जात आहे. दरम्यान, या राज्यात आजपर्यंंत ५३0 मि.मी. पाऊस झाला असून, तो ९३६ या सरासरीच्या ५६.६ टक्के आहे. राज्यातील सर्व धरणे, जलाशयात केवळ ४९ टक्के एवढा पाणीसाठा आहे. विदर्भात सामान्य ८१४.९ मि.मी. पाऊस हवा होता. प्रत्यक्षात ६८२.८ मि.मी. पाऊस झाला आहे. म्हणजचे १६ टक्के हा पाऊस कमी आहे. आणखी पाऊस न आल्यास सामान्यापेक्षा कमी नोंद होण्याची शक्यता आहे. पश्‍चिम विदर्भातही विदारक चित्र आहे. या भागात पाऊस नाही आणि तापमान वाढल्याने पिकांचे नुकसान होत असून, पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जागतिक हवामान संघटना व इतर विदेशी हवामानशास्त्राच्या अंदाजानुसार यावर्षी कमी पाऊस झाला असून, परतीच्या पावसाला सुरुवात होण्याची चिन्हे तयार झाली आहेत. पण, वातावरणात तापमान वाढत असल्याने पावसाची शक्यता पुणे येथील जेष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली.

धरणात ४९ टक्केच जलसाठा

         राज्यातील सर्व धरणात आजमितीस ४९ टक्के जलसाठा असून, गेल्यावर्षी याच सुमारास हा साठा ६६ टक्के होता. मराठवाड्यात आजमितीस ८ टक्के जलसाठा असून, कोकण ८५ टक्के, नागपूर ७३ टक्के, अमरावती विभाग ४७ टक्के, नाशिक ४१ टक्के, पुणे ५0 टक्के व इतर धरणात ७१ टक्के, असा सरासरी ४९ टक्के जलसाठा आहे. दोन हजारांवर गावांना टॅँकरने पाणीपुरवठा राज्यातील १५७६ गावे आणि २,८९६ वाड्यांना सध्या १९८९ टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

रोहयोच्या कामावर ८९ हजार मजूर

       दरम्यान, या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यात दुष्काळी कामे सुरू करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत असून, आजमितीस महाराष्ट्र रोजगार हमी योजनेंतर्गत ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत १२ हजार २६४ कामे सुरू करण्यात आली असून, ८८ हजार ८४५ मजुरांना काम देण्यात आले आहे. राज्यात ४ लाख २६ हजार ६३५ कामे असून, त्या कामाची मंजुरी क्षमता १३0३.३८ लाख एवढी आहे.

उत्पादन घटणार

         यावर्षी राज्यात १२७.८९ लाख हेक्टर म्हणजेच ९५ टक्के क्षेत्रावर विविध पिकांची पेरणी झाली असून, सुरुवातीला दीड महिना आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्यात झालेल्या किरकोळ पावसानंतर आतापर्यंंत पावसाने दडी मारली आहे. सतत पावसाचा ताण सहन करणार्‍या पिकांची वाढ खुंटली असून, बदलत्या हवामानामुळे किडींनी या पिकावर आक्रमण केले आहे. मराठवाडा व इतर कमी पाऊस झालेल्या राज्यातील मध्य, उत्तर व पश्‍चिम महाराष्ट्रातील काही भागात उत्पादन निघणेच कठीण झाले, तर विदर्भातील स्थिती किंबहुना अशीच आहे. त्यामुळे यावर्षी शेतीचे अर्थचक्रच थांबले म्हणावे लागणार आहे.

सात-आठ तारेखला विदर्भात पावसाची शक्यता

          दरम्यान, येत्या ७ व ८ सप्टेंबर रोजी विदर्भात पाऊस येण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. तसे चित्र तयार होत आहे.

Web Title: Monsoon returns!