मानसेवी महिला कर्मचार्‍यांच्या अतिक्रमणाकडे कानाडोळा

By Admin | Updated: September 2, 2014 20:13 IST2014-09-02T20:13:32+5:302014-09-02T20:13:32+5:30

मनपातील मानधन तत्त्वावर कार्यरत एका महिला कर्मचार्‍याच्या अतिक्रमित घराला प्रशासनाने जाणीवपूर्वक अभय दिल्याचा प्रकार उघडकीस

Monsieur worried about the encroachment of female employees | मानसेवी महिला कर्मचार्‍यांच्या अतिक्रमणाकडे कानाडोळा

मानसेवी महिला कर्मचार्‍यांच्या अतिक्रमणाकडे कानाडोळा

अकोला : शहरात रस्त्यालगत थाटण्यात आलेल्या अतिक्रमित झोपड्यावजा घरे महापालिका प्रशासनाने जमीनदोस्त केल्याने गोरगरिबांचे संसार उघड्यावर आले. अतिक्रमित झोपड्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची सबब पुढे करीत उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी गरिबांच्या घरांवर अक्षरश: 'जेसीबी' फिरवला; मात्र मनपातील मानधन तत्त्वावर कार्यरत एका महिला कर्मचार्‍याच्या अतिक्रमित घराला प्रशासनाने जाणीवपूर्वक अभय दिल्याचा प्रकार उघडकीस आल्याने आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या प्रामाणिक उद्देशावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी शहराला अतिक्रमणमुक्त करण्याचा संकल्प करीत अतिक्रमण निर्मूलनाची धडक मोहीम सुरू केली. यादरम्यान, मुख्य रस्ते किंवा प्रभागात झोपड्या उभारून संसाराचा गाडा हाकणार्‍या गोरगरीब कुटुंबांना हुसकावण्यात आले. अनेक ठिकाणी आवश्यकता नसताना गरिबांच्या झोपड्यांवरून वरवंट्याप्रमाणे ह्यजेसीबीह्ण फिरवण्यात आला. अतिक्रमणाला कदापी थारा नाही, अशी भीमगर्जना करणारे प्रशासन त्यांच्याच महिला कर्मचार्‍याने थाटलेल्या अतिक्रमित घराकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. मनपामध्ये मानधन तत्त्वावर कार्यरत सुनीता मोरे यांच्या अतिक्रमित घरामुळे प्रचंड मानसिक त्रास व गैरसोय होत असल्याची तक्रार बिर्ला रोड परिसरातील रामदूत अपार्टमेन्टमधील नागरिकांनी प्रशासनाकडे केली. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने उपायुक्त दयानंद चिंचोलीकर, क्षेत्रीय अधिकारी जी.एम.पांडे, राजेंद्र घनबहाद्दूर यांनी अतिक्रमित घराची पाहणी करीत अतिक्रमण हटविण्याचे आदेश अतिक्रमण विभाग प्रमुख विष्णू डोंगरे यांना दिले; परंतु कोठे माशी शिंकली देव जाणे, तक्रारीला एक महिन्याचा कालावधी होत असताना, अद्यापही सदर अतिक्रमित घर हटविण्याची कारवाई झाली नाही. अर्थातच, प्रशासन त्यांच्या कर्मचार्‍यांच्या अतिक्रमणाकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करीत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. यासंदर्भात कर्तव्यदक्ष आयुक्त डॉ. कल्याणकर काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. आयुक्तांनी जर ठोस निर्णय घेतला नाही तर आयुक्त समन्यायी नाही असा संदेश नागरिकांमध्ये जाण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाला आता कठोर निर्णय घेण्या शिवाय पर्याय उपलब्ध नाही.

** खासगी भूखंडांवर अतिक्रमण

बिर्ला रोडलगतच्या काही खासगी भूखंडांवर नागरिकांनी मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमण थाटले आहे. टिनाच्या झोपड्या उभारून त्यांचा वापर शेळ्य़ा-मेंढय़ा, म्हैस आदींसाठी होत असल्याचे समोर आले आहे. गुरांचे शेण उघड्यावर टाकल्या जात असल्याने परिसरातील रहिवासी व एका महाविद्यालयातील विद्यार्थ्याचे आरोग्य धोक्यात आले आहे. हा प्रकार अतिक्रमण विभागाचे विष्णू डोंगरे यांच्या नजरेतून कसा सुटला, यावर उलट सुलट चर्चेला ऊत आला आहे.

** पक्की घरे असतानाही कब्जा

बिर्ला रोडलगत खासगी भूखंड तसेच रस्त्यांवर अतिक्रमित घरे उभारणार्‍या काही अतिक्रमकांची न्यू तापडिया नगरमध्ये पक्की घरे असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. खासगी भूखंडावरून हटण्यासाठी संबंधित जागा मालकाकडून मोठी रकम उकळण्याचा संबंधित अतिक्रमकांचा व्यवसाय बनला असून, या प्रकाराला काही बिल्डर व जागा मालक बळी पडल्याची माहिती आहे.

Web Title: Monsieur worried about the encroachment of female employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.