‘मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन’ गुन्हेगारांची कर्दनकाळ!
By Admin | Updated: August 18, 2016 00:30 IST2016-08-18T00:30:52+5:302016-08-18T00:30:52+5:30
अकोला पोलीस दलात फिंगर प्रिंट विभागामध्ये मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन दाखल.

‘मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन’ गुन्हेगारांची कर्दनकाळ!
सचिन राऊत
अकोला, दि. १७: अकोला पोलीस दलात फिंगर प्रिंट विभागामध्ये मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन दाखल झाली आहे. या व्हॅनमध्ये असलेल्या विशेष १३ पेट्यांमधील तांत्रिक यंत्रांद्वारे डीएनए टेस्टसह नार्को टेस्ट आणि बलात्कार प्रकरणाचे घटनास्थळावरील नमुने व अशा अनेक गुन्हय़ांचे नमुने घेऊन त्याची प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे.
जिल्हय़ातील कोणत्याही ठिकाणावर गुन्हा घडल्यानंतर ही मोबाइल फ ॉरेन्सिक व्हॅन घटनास्थळावर दाखल होऊन तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर खून असल्यास घटनास्थळावरील रक्ताचे नमुने घेऊन त्याचा रंग बदलण्याच्या आधीच तपासणी करण्यासाठी मदत होणार आहे. यासोबतच घटनास्थळाची फोटोग्राफी आणि व्हीडीओग्राफी या व्हॅनच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अमरावती येथील फॉरेन्सिक तज्ज्ञ या व्हॅनचे कामकाज सांभाळणार असून, पुरावे गोळा करून ते तत्काळ तपासण्यास मदत होणार असल्याची माहिती आहे. स्फोटक तपासणी कीटसह नार्को टेस्टची कीटही या मोबाइल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये देण्यात आली आहे. यापूर्वी गुन्हा घडल्यानंतर त्या प्रकरणाचे पुरावे गोळा करून त्याचा अहवाल येइपर्यंंंंत ६ ते ७ दिवसांचा कालावधी उलटत होता; मात्र आता या व्हॅनमुळे एका दिवसातच सर्व अहवाल प्राप्त होणार असल्याने तपासाला गती मिळणार आहे. यासोबतच पुरावे नष्ट होण्याचे प्रमाण कमी होणार असल्याने ही व्हॅन गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी मोठी लाभदायी ठरणार आहे. पोलीस प्रशासन आणि तपास अधिकार्यांसाठी ही व्हॅन मोठी फायदय़ाची राहणार आहे.
मल्टीकलर फ्ल्यूरोसंट पावडर
एखाद्या गुन्हय़ातील घटनास्थळावर गुन्हेगारांच्या हाताचा स्पर्श झाला असेल तर त्या ठिकाणची तपासणी करण्यासाठी नवीन अशी मल्टीकलर फ्ल्यूरोसंट पावडर या व्हॅनमध्ये राहणार आहे. या पावडरमुळे गुन्हेगारांच्या हाताच्या ठस्यांची तपासणी करून त्याचा अहवाल तत्काळ उपलब्ध होणार आहे. तांत्रिकदृष्ट्या आतापर्यंंंत अडचणी असलेल्या पोलीस खात्यात नवीन आणि अत्याधुनिक अशा सुविधा प्राप्त झाल्याने गुन्हेगारांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
पुरावे नष्ट होण्याचे प्रमाण होणार कमी
एखाद्या घटनास्थळावर मोठी गर्दी झाल्यानंतर पुरावे नष्ट होण्याचे प्रमाण खूप होते; मात्र आता या मोबाइल फॉरेन्सिक व्हॅनमुळे पुरावे नष्ट होण्याचे प्रमाण कमी होणार आहे. कारण गुन्हय़ातील सर्व प्रकारचे नमुने व्हॅनमधील अत्याधुनिक यंत्राच्या सहाय्याने तत्काळ घेण्यात येणार आहेत.