सर्वोपचार रुग्णालयातून सिटी स्कॅन  मशीनचे ‘फॅन्टम’ उपकरण गहाळ

By Atul.jaiswal | Updated: August 4, 2018 15:44 IST2018-08-04T15:42:21+5:302018-08-04T15:44:37+5:30

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या क्ष-किरण विभागातून सिटी-स्कॅन मशीन दुरुस्तीसाठी आवश्यक असलेले उपकरण गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती शुक्रवारी समोर आली.

 Missing 'Phantom' device of City Scan machine from GMC Akola | सर्वोपचार रुग्णालयातून सिटी स्कॅन  मशीनचे ‘फॅन्टम’ उपकरण गहाळ

सर्वोपचार रुग्णालयातून सिटी स्कॅन  मशीनचे ‘फॅन्टम’ उपकरण गहाळ

ठळक मुद्दे गत २० जुलैपासून तांत्रिक कारणामुळे ही मशीन बंद आहे. नादुरुस्त सिटी स्कॅन मशीन दुरुस्त करण्यासाठी तंत्रज्ञांना पाचारण करण्यात आले. मशीनसोबत असलेले फॅन्टम हे उपकरणच या विभागात नसल्याचे निदर्शनास आले.

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या क्ष-किरण विभागातून सिटी-स्कॅन मशीन दुरुस्तीसाठी आवश्यक असलेले उपकरण गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती शुक्रवारी समोर आली. दरम्यान, सदर वृत्त लिहिस्तोवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून यासंदर्भात कोणतीही तक्रार प्राप्त झाली नसल्याचे सिटी कोतवाली पोलिसांनी सांगितले.
सर्वोपचार रुग्णालयात वर्ष २०१२ मध्ये बसविण्यात आलेली सिटी स्कॅन मशीन वारंवार नादुरुस्त होत असून, गत २० जुलैपासून तांत्रिक कारणामुळे ही मशीन बंद आहे. मशीनमध्ये बिघाड निर्माण झाल्यास तो शोधून काढण्यासाठी व दुरुस्त करण्यासाठी मशीनसोबतच ‘फॅन्टम’ नावाचे उपकरण असते. नादुरुस्त सिटी स्कॅन मशीन दुरुस्त करण्यासाठी तंत्रज्ञांना पाचारण करण्यात आले असता, मशीनसोबत असलेले फॅन्टम हे उपकरणच या विभागात नसल्याचे निदर्शनास आले. दुरुस्तीसाठी आलेल्या अभियंत्याने सिटी स्कॅन विभागातून फॅन्टम हे उपकरण गहाळ झाल्याचा अहवाल दिल्यानंतर रुग्णालय प्रशासनाला ही बाब कळली. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेत अंतर्गत पातळीवर चौकशी केली; परंतु त्यामधून काहीही निष्पन्न होत नसल्याचे पाहून पोलिसांत तक्रार देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार तत्कालीन विभागप्रमुख सातघरे यांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन गेले. तथापि, हा प्रकार घडला त्यावेळी ते रजेवर असल्याने पोलिसांनी त्यांच्याकडून तक्रार घेण्यास नकार दिल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूत्रांनी सांगितले. आता सिटी स्कॅन विभागाचे तंत्रज्ञ याबाबत पोलिसांत तक्रार देणार असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.

‘फॅन्टम’ गेले कुठे?
सिटी स्कॅन मशीन कार्यान्वित करण्यात येते, तेव्हा त्या मशीनसोबतच ‘फॅन्टम’ हे उपकरण असते. हे उपकरण या मशीनचा महत्त्वाचा भाग असून, मशीन नादुरुस्त झाल्यास बिघाड शोधून काढण्यासाठी त्याची मदत होते. यापूर्वी मे महिन्यात मशीन नादुरुस्त झाली होती, तेव्हा हे उपकरण सिटी स्कॅन विभागातच होते. त्यानंतर मध्यंतरीच्या काळात उपकरण कुठे गायब झाले, हा प्रश्न आता प्रशासनाला पडला आहे.

चौकशी समिती गठित
सिटी स्कॅन विभागातून ‘फॅन्टम’ हे उपकरण गहाळ झाल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने चौकशी समिती गठित केली आहे. यामध्ये उप अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, डॉ. श्याम सिरसाम व मुख्य प्रशासकीय अधिकारी दिगावकर यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

Web Title:  Missing 'Phantom' device of City Scan machine from GMC Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.