आकोट तहसीलमधून महत्त्वपूर्ण फायली गहाळ
By Admin | Updated: June 15, 2014 21:57 IST2014-06-15T19:40:59+5:302014-06-15T21:57:38+5:30
माहिती अधिकारात झाला गौप्यस्फोट

आकोट तहसीलमधून महत्त्वपूर्ण फायली गहाळ
आकोट : येथील तहसील कार्यालयातून जामिनीच्या व्यवहारातील, एनएपी ३४, कूळ काढणे, सरकारी भूखंड खरेदी आदेश यांच्या अनेक महत्त्वपूर्ण फायली गहाळ झाल्याचे धक्कादायक सत्य माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीवरून उघडकीस आले आहे. यासंदर्भात मात्र अद्यापही कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही.
शेतजमिनी आणि अकृषक भूखंड घोटाळाप्रकरणात आकोट अग्रक्रमावर असून, शेती नियमबापणे अकृषक करणे, ग्रीन झोनमधील शेती अकृषक करणे, शेतीत अकृषक वापर केल्याबाबत दंड करवून घेऊन या दंडाच्या आदेशावरच प्रकरण अकृषक केल्याचे भासविणे, शासकीय भूखंड गिळंकृत करणे, सातबारावरील बोजा गायब करणे, असे अनेक बेकायदेशीर प्रकार येथे अव्याहतपणे आणि शासन यंत्रणेला हाताशी धरून केले जात असल्याचे दिसत आहे. भूखंड माफियांना धंद्यात वारेमाप कमाई होत असल्याने शासकीय यंत्रणेच्या खिशात अमाप पैसा कोंबल्या जातो. ही यंत्रणा एवढ्यावरच थांबली नसून, भूखंड माफिया आपल्या हस्तकांकरवीच या प्रकरणांच्या संपूर्ण फायली गहाळ करून टाकतात. कितीही कसून शोध घेतला तरी या प्रकरणांचा थांगपत्ता लागत नाही. अशाच काही प्रकरणांची माहिती मागितली असता आकोट तहसीलमध्ये ही प्रकरणेच उपलब्ध नसल्याची माहिती चंद्रशेखर बारब्दे यांना देण्यात आली आहे. त्यांनी माहिती अधिकाराअंतर्गत काही एनएपी ३४, कूळ काढण्याचे आदेश तथा सरकारी भूखंड विक्रीच्या आदेशांची माहिती मागितली होती.