मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी उतरणार निवडणूक रिंगणात
By Admin | Updated: September 21, 2014 01:35 IST2014-09-21T01:35:55+5:302014-09-21T01:35:55+5:30
अल्पसंख्याक मतांच्या विभाजनाची शक्यता.

मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी उतरणार निवडणूक रिंगणात
अकोला : मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी (एमडीपी)विधानसभेच्या अकोला पश्चिम, आकोट आणि बाळापूर मतदारसंघातून उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा शनिवारी पक्षाच्या पदाधिकार्यांनी पत्रकार परिषदेत केली. या नव्या पक्षाच्या प्रवेशामुळे जिल्ह्यात अल्पसंख्याक मतांचे विभाजन होण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या सर्वच राजकीय पक्षांनी अल्पसंख्याक समाजाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप एमडीपीचे जिल्हाध्यक्ष मो. सोहेल कादरी यांनी पत्रकार परिषदेत केला. राज्यातील कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस सरकार महागाई व भ्रष्टाचार कमी करण्यास अपयशी ठरले आहे. राज्यात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचार वाढतच आहेत. त्यामुळे एमडीपी विधानसभा निवडणुकीत उतर त असल्याचे जिल्हाध्यक्ष कादरी यांनी सांगितले. जिल्ह्यातील अकोला पश्चिम, बाळापूर आणि आकोट मतदारसंघात एमडीपीला अल्पसंख्याक, दलित आणि काही हिंदूचाही पाठिंबा मिळेल, असाही दावा कादरी यांनी केला. निवडणुकीत रिपाइंसोबत (गवई गट) आघाडी केली असल्याचेही कादरी यांनी सांगितले. मुस्लीम समाजाने स्वातंत्र्य लढय़ात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यामुळे मुस्लीम समाजाला देशभक्तीसाठी कोणाच्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असेही कादरी यांनी स्पष्ट केले.