गौण खनिजाच्या रॉयल्टीवर तोडगा निघेना!
By Admin | Updated: December 17, 2015 02:15 IST2015-12-17T02:15:24+5:302015-12-17T02:15:24+5:30
राज्यभरात खाण व क्रशर उद्योजकांचा बंद सुरुच.

गौण खनिजाच्या रॉयल्टीवर तोडगा निघेना!
अकोला : महाराष्ट्र शासनातर्फे गौण खनिजावर वाढविण्यात आलेल्या शंभर टक्के रॉयल्टी विरोधात महाराष्ट्र राज्य खाण व क्रशर उद्योजकांतर्फे गत महिनाभरापासून नागपूर अधिवेशनावर बेमुदत आंदोलन करण्यात येत आहे. परंतु, अद्यापही यावर ठोस तोडगा निघत नसून, केवळ तोंडी आश्वासनांवर त्यांची बोळवण करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने १0 मे २0१५ पासून गौण खनिजावरील रॉयल्टी १00 टक्क्यांनी वाढवली आहे. परिणामी गौण खनिजांच्या किमती प्रचंड वाढल्या असून, आतापर्यंत २00 रुपये ब्रासप्रमाणे मिळणारे गौण खनिज ३00 रुपये ब्रास याप्रमाणे मिळत आहे. शासनाच्या या धोरणाविरोधात महाराष्ट्र खाण व क्रशर उद्योजक संघाच्या वतीने १५ नोव्हेंबरपासून राज्यभरात टप्प्याटप्प्यानी बंद पुकारण्यात आला. गौण खनिजावर दुपटीने वाढविण्यात आलेली रॉयल्टी कमी करण्याच्या मागणीसाठी खाण व क्रशर उद्योजकांचे नागपूर हिवाळी अधिवेशनावर बेमुदत आंदोलन सुरू आहे. यासंदर्भात संघटनेच्या वतीने सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले असून, विधानसभेतही हा मुद्दा चांगलाच गाजला. परंतु, यावर अद्यापही ठोस तोडगा निघाला नसल्याने खाण व क्रशर उद्योजकांचा बेमुदत बंद कायम राहणार असल्याचे खाण व क्रशर उद्योजक संघाच्या वतीने सांगण्यात आले आहे. गौण खनिजावरील रॉयल्टी कमी करण्यासंदर्भात खाण व क्रशर उद्योजकांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले असून, मुख्यमंत्र्यांनी १00 रुपयांनी रॉयल्टी कमी करण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु, जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत बंद कायम राहणार असल्याचे जिल्हा खाण व क्रशर उद्योजक संघाचे अध्यक्ष नवीन खोसला यांनी स्पष्ट केले. १00 रुपयांनी रॉयल्टी कमी होण्याची शक्यता खाण व क्रशर उद्योजकांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान गौण खनिजावरील रॉयल्टी १00 रुपयांनी कमी करण्याचे आश्वासन बुधवारी मुख्यमंत्र्यांनी दिले. परंतु, हे केवळ तोंडी आश्वासन असल्याने खाण व क्रशर उद्योजकांनी आंदोलन सुरू ठेवत लेखी आश्वासनाची मागणी केली आहे.