राज्यमंत्र्यांनी घेतला नवोदयचा वर्ग!
By Admin | Updated: April 4, 2015 02:04 IST2015-04-04T02:04:38+5:302015-04-04T02:04:38+5:30
विद्यार्थीनींचा छळ करणार्या प्रत्येक दोषीवर कठोर कारवाई करण्याचा रणजीत पाटील यांचा इशारा; दोन्ही शिक्षक निलंबित.

राज्यमंत्र्यांनी घेतला नवोदयचा वर्ग!
अकोला - जवाहर नवोदय विद्यालयातील ४९ विद्यार्थीनींचा छळ करणार्या दोन शिक्षकांसह या गंभीर प्रकरणात सहभागी असलेल्या प्रत्येक दोषीवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा गृह राज्यमंत्री, तथा जिल्हयाचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला. तत्पूर्वी, नवोदयच्या प्राचार्यांसह तेथील कर्मचार्यांचा ह्यवर्गह्ण घेऊन डॉ. रणजीत पाटील यांनी त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. बाभुळगाव जहांगीर येथील नवोदय विद्यालयामध्ये ३८0 विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यापैकी बहुतांश विद्यार्थी हे अतिशर साधारण परिस्थीतीतून आलेले आणि होतकरु आहेत. अशा विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक गुणांसाठी वेठीस धरुन आणि विद्यालयामधून काढण्याच्या धमक्या देत त्यांचा छळ करणे ही बाब शिक्षण क्षेत्रासाठी अशोभनीय आणि निंदनीय असल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले. येथील शिक्षक राजन गजभीये आणि शैलेष रामटेके यांनी विद्यार्थीनींचा केलेला छळ हा पराकोटीला गेला असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले. त्याचप्रमाणे या शिक्षकांना पाठिशी घालणारे आणि विद्यार्थीनींच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणार्या प्रत्येक दोषीवरही कारवाई करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. या प्रकरणाचा सखोल आणि प्रत्येक अंगाने तपास करण्यात येत असून दोषी शिक्षकांचा शोधही सुरू आहे. पोलिस शिक्षकांच्या मागावरच असून लवकरच त्यांना अटक करण्यात येणार असल्याचेही डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले. या प्रकरणातील ४९ विद्यार्थीनींचे बयाण नोंदविण्यात आले असून प्रत्येक विद्यार्थीनीशी महिला पोलिस अधिकारी आणि महिला व बालकल्याण समिती संवाद साधून या प्रकरणातील तथ्य बाहेर काढत आहे. या प्रकरणाचा चौकशी अहवाल अंतीम टप्प्यात असून त्यानंतर पुढील कारवाई करण्याची ग्वाही डॉ. रणजीत पाटील यांनी दिली. या प्रकरणात आणखी काही शिक्षक दोषी असल्याची माहिती समोर येत असून, चौकशीनंतर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. त्यादृष्टीने बारकाईने तपास सुरु असल्याचे डॉ. पाटील यांनी यावेळी सांगीतले.