मिनी ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले
By Admin | Updated: May 10, 2014 20:24 IST2014-05-10T19:41:43+5:302014-05-10T20:24:27+5:30
मिनी ट्रकने दिलेल्या धडकेमुळे दुचाकीवरील एक जण जागीच ठार

मिनी ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले
बोरगाव मंजू : भरधाव मिनी ट्रकने दिलेल्या धडकेमुळे दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर वाशिंबा बसथांब्यानजीक शनिवार, १० मे रोजी दुपारी २.३० वाजता घडली. सचितानंद रामदास दोनतकर (३०), असे ठार झालेल्या तरुणाचे नाव असून, अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर येथील धारकडचा रहिवासी असल्याचे कळले आहे.
अमरावती जिल्ह्यातील धारकड येथील सचितानंद रामदास दोनतकर आणि त्याचा मित्र हे दोघे दुपारी २.३०च्या सुमारास एमएच-२७, एएम २१७४ क्रमांकाच्या दुचाकीने अकोलाकडून बोरगाव मंजूकडे येत होते. त्याचवेळी एक मालवाहू मिनी ट्रक भरधाव बोरगावकडे येत होता. या मिनी ट्रक च्या चालकाने वाशिंबा बसथांब्यानजीक चुकीच्या बाजूने वाहन नेत दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात सचितानंद दोनतकर जागीच ठार झाला. त्याच्या सोबतच्या मित्राला कसलीच इजा झाली नाही; परंतु अपघात घडल्यानंतर घाबरून तो घटनास्थळावरून पसार झाला. दुचाकीला धडक देणार्या मिनी ट्रकसह चलकही फरार झाला. या अपघाताची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिस स्टेशनचे ठाणेदार डी. के. आव्हाळे, हेकाँ. अरुण गावंडे, प्रकाश जुनगडे, शशिकांत पाटील, दंदी, धाडे, राठोड आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा क रीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथे सर्वोपचार रुग्णालयात पाठविला. फरार मिनी ट्रकचालकाचा पोलिस शोध घेत आहेत. (वार्ताहर)