मिड ब्रेन अँक्टिवेशन फसवणूकच - वाघ
By Admin | Updated: April 25, 2015 02:19 IST2015-04-25T02:19:31+5:302015-04-25T02:19:31+5:30
अंनिसचा दावा; २१ लाखाचे बक्षीस जाहीर

मिड ब्रेन अँक्टिवेशन फसवणूकच - वाघ
बुलडाणा: मिड ब्रेन अँक्टिवेशन, सुपर सेन्सरी डेव्हलपमेंट नावाखाली सुरू असलेला प्रकार ही शुद्ध फसवणूकच आहे. या फसवणुकीपासून पालकांची होणारी आर्थिक लूट थांबली पाहिजे, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विदर्भ संघटक किशोर वाघ यांनी पत्रकार परिषदेत केले. येथील बुलडाणा अर्बनच्या सहकार सेतु सभागृहात अंनिसने पत्रकार परिषद घेऊन हे प्रशिक्षण विज्ञानाच्या आधारे नसून पालक व बालकांची फसवणूक असल्याचा दावा त्यांनी केला. डोळ्यावर पट्टी बांधून मिड ब्रेन सुपर सेन्समुळे बालकांना आपोआप दिसते. रंग, नोटांचे नंबर ओळखणे, वाचन करणे, वाहन चालविणे असे डेमो दाखवून चमत्कारिक दावे केले जातात. यालाच भारतीय परंपरेमध्ये दिव्यदृष्टी असे म्हणतात. प्रत्यक्षात जगाच्या पाठीवर अशी दिव्यदृष्टी कोणालाही प्राप्त झाली नसून, हे सर्व थोतांड आहे. स्मरणशक्ती वाढणे, एकाग्रता वाढणे अशा भूलथापा देऊन आयोजक व त्यांचे प्रशिक्षक मिड ब्रेन अँक्टीवेशनचे प्रशिक्षण घेऊन मुलांमध्ये चमत्कारिक शक्ती निर्माण झाली, असे भासवतात. अशा चमत्कारिक प्रशिक्षणातून मुलांमध्ये मेहनतीतून उत्तम मार्क मिळवावे लागतात, यावरचा विश्वास उठतो व त्याचे पुढील शैक्षणिक आयुष्य बेकार होते. पुढे हेच विद्यार्थी अपयशाने खचून जावून त्यांना नैराश्य येते. दरम्यान, डोळ्यावर पट्टी बांधून मिड ब्रेन सुपरसेन्समुळे नोटांचे नंबर ओळखणे, पुस्तक वाचने, वाहन चालविणे हे अंनिसच्या तज्ज्ञ समितीसमोर सिद्ध केल्यास अशा व्यक्तीला २१ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याचे यावेळी किशोर वाघ यांनी सांगितले.