महू-अकोला पॅसेंजरचे डबे रुळावरून घसरले!
By Admin | Updated: September 21, 2015 01:31 IST2015-09-21T01:31:02+5:302015-09-21T01:31:02+5:30
विभागीय वरिष्ठ सुरक्षा अधिका-यांची पाहणी, पॉइंट्स मॅनवर कारवाई होणार.

महू-अकोला पॅसेंजरचे डबे रुळावरून घसरले!
अकोला: दक्षिण मध्य रेल्वेच्या महू-अकोला पॅसेंजर शनिवारी रात्री अकोला रेल्वे स्टेशनवर आली. दरम्यान, रेल्वेगाडी महूकडे रवाना होण्यासाठी निघाल्यावर रेल्वेपुलानजिकच रात्री ११ वाजताच्या सुमारास गाडीचे दोन डबे रुळावरून खाली उतरले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. शनिवारी महू-अकोला पॅसेंजर रेल्वे स्टेशनवर आली. रेल्वेगाडीच्या शेवटी एकच एसएलआर बोगी असल्याने, तिला परतीदरम्यान इतर बोगींच्या मागे जोडण्यासाठी रेल्वेगाडीपासून वेगळे करण्यात आले. दरम्यान लूप लाइनवरून मेन लाईनवर एसएलआर बोगीला जोडण्याचे काम सुरू करण्यात आले. पॉईंटजवळ अंधार असल्याकारणाने कर्मचार्यांच्या बोगी व्यवस्थित जोडल्या गेली नसल्याची बाब लक्षात आलीच नाही आणि एसएलआर बोगीची दोन चाके रुळावरून खाली उतरली. घटनेची सूचना स्थानिक रेल्वे अधिकार्यांना देण्यात आल्यावर दोन तास परिश्रम करून डबे पुन्हा रुळावर आणण्यात यश आले. दक्षिण-मध्य रेल्वेचे नांदेड विभागाचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी सी. एच. कृष्णाप्रसाद यांनी रविवारी अकोल्यात येऊन शनिवारी रात्री घडलेल्या रेल्वे अपघाताची पाहणी केली आणि रात्री ड्युटीवरील अधिकारी व कर्मचार्यांचे जबाब नोंदविले. यामागे पॉइंटस मॅनची चूक असल्याचे समोर आल्याने, त्याच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती कुष्णाप्रसाद यांनी लोकमतशी बोलताना दिली.