पुरुषांत अमरावती व महिलांत नागपूरचा संघ अजिंक्य
By Admin | Updated: January 25, 2016 02:14 IST2016-01-25T02:14:53+5:302016-01-25T02:14:53+5:30
केळीवेळीतील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा थाटात समारोप.

पुरुषांत अमरावती व महिलांत नागपूरचा संघ अजिंक्य
केशव सांगूनवेढे / केळीवेळी (जि. अकोला): हनुमान क्रीडा प्रसारक व बहूद्देशीय मंडळाच्या वतीने दिवंगत नारायणराव भरणे, रामराव शिवरकार व पांडुरंग आक्तुरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २२ ते २४ जानेवारीदरम्यान आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत अंतिम दिवशी झालेल्या चुरशीच्या व उत्कंठावर्धक सामन्यात पुरुष संघात सर्मथ क्रीडा मंडळ अमरावती संघ तर महिलांच्या संघात संघर्ष क्रीडा मंडळ नागपूर या संघांनी बाजी मारून ते विजेते ठरले. या स्पर्धांंचा रात्री बक्षीस वितरण कार्यक्रमाने समारोप करण्यात आला. प्रथम क्रमांकावर आलेल्या पुरुष गटामधील सर्मथ क्रीडा मंडळ नागपूर संघाने ५१ हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. द्वितीय क्रमांक मिळविणार्या रेंज पोलीस नागपूरच्या संघाला ४१ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. तृतीय क्रमांकाचे ३१ हजार रुपयांचे बक्षीस सिटी पोलीस नागपूर व महेंद्रा अँन्ड महेंद्रा संघ नागपूरला विभागून देण्यात आले. महिला गटातील प्रथम क्रमांकाचे ३१ हजार रुपयांचे बक्षीस संघर्ष क्रीडा मंडळ नागपूरने पटकावले. द्वितीय क्रमांकाचे २१ हजार रुपयांच बक्षीस रेंज पोलीस नागपूर संघाने प्राप्त केले. तृतीय क्रमांकाचे ११ हजार रुपयांचे बक्षीस प्राजक्ता क्रीडा मंडळ अकोला व सिटी पोलीस नागपूर संघांना विभागून देण्यात आले. यापूर्वी सकाळच्या सत्रात खेळण्यात आलेल्या सामन्यात अनेक संघांनी प्रतिस्पर्धी संघांना धूळ चारत विजय संपादन केला होता. रात्री झालेल्या कार्यक्रमात आमदार पांडुरंग फुंडकर, शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, माजी मंत्री गुलाबराव गावंडे, जि.प. सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी,अँड. मोतीसिंह मोहता, प्रा. सुभाष भडांगे यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल पिलात्रे यांनी, मार्गदर्शन गजानन दाळू गुरुजी यांनी तर आभार प्रदर्शन हनुमान क्रीडा प्रसारक व बहूद्देशीय मंडळाचे अध्यक्ष माधवराव बकाल यांनी केले.