समिती गठणासाठी सदस्यच सापडेना!
By Admin | Updated: January 6, 2015 01:33 IST2015-01-06T01:33:27+5:302015-01-06T01:33:27+5:30
होर्डिंग्ज समितीसाठी अकोला मनपाची शोध मोहीम.

समिती गठणासाठी सदस्यच सापडेना!
अकोला : शहरात अनधिकृत होर्डिंग्जला आळा घालण्यासाठी मनपा प्रशासनाने आयुक्तांच्या देखरेखीत शहर समिती व क्षेत्रीय अधिकार्यांच्या स्तरावर झोननिहाय समितीचे गठण करण्याचा निर्णय घेतला. याकरिता अकोलेकरांना आवाहन करण्यात आले होते; परंतु एक महिना उलटून गेल्यानंतरदेखील मनपाला एकही अर्ज प्राप्त झाला नसल्याची बिकट परिस्थिती समोर आली. समिती गठणासाठी प्रशासनाला सदस्य सापडत नसल्याने इच्छुक सदस्यांची शोध मोहीम घेण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मनपा उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस अनधिकृत होर्डिंंग्ज हटवण्याची कारवाई केली होती. यामध्ये प्रशासनाने गांधी रोड ते तहसील कार्यालय मार्गावरील दुकानांचे नामफलक काढण्याच्या मुद्यावर वादंग निर्माण झाले. प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता, कारवाई केल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला होता. त्यानंतर उपायुक्त चिंचोलीकर यांनी होर्डिंग्ज हटविण्याच्या संदर्भात उच्च न्यायालयाने जारी केलेल्या निर्देशानुसार शहर समिती व झोन स्तरावरील समिती गठणासाठी पुढाकार घेतला.
यामध्ये झोन समितीसाठी संबंधित क्षेत्रीय अधिकार्यांच्या स्तरावर समितीचे गठन करण्याचे निर्देश आहेत. याकरिता प्रशासनाने इच्छुक अकोलेकरांना समितीमध्ये सदस्य होण्यासाठी आवाहन केले होते. अकोलेकरांनी मात्र या विषयाकडे पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. एक महिना उलटून गेल्यावरदेखील मनपाकडे एकही अर्ज सादर झाला नसल्याची माहिती आहे. यामुळे क्षेत्रीय अधिकार्यांवर इच्छुक सदस्यांची शोध मोहीम घेण्याची वेळ आली आहे. आता अधिकारी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
*कोण असेल शहर समितीमध्ये?
शहर समितीमध्ये मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालयातील नोडल अधिकारी, पोलीस अधिकारी व झोननिहाय समितीमार्फत आलेल्या सदस्यांचा समावेश राहील. शहर समितीची बैठक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनानंतर दुपारी १२ वाजता घेतली जाईल. समिती गठित न झाल्यामुळे बैठकही लांबणीवर गेली आहे.