आता मुलाखतीपूर्वीच भावी अधिका-यांची वैद्यकीय तपासणी
By Admin | Updated: January 9, 2015 01:52 IST2015-01-09T01:22:18+5:302015-01-09T01:52:29+5:30
एमपीएससी ; सामान्य प्रशासनाचा निर्णय.

आता मुलाखतीपूर्वीच भावी अधिका-यांची वैद्यकीय तपासणी
संतोष वानखडे/वाशिम: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांची तयारी करणार्या उमेदवारांना आता मुलाखतीपूर्वीच वैद्यकीय तपासणीला सामोरे जावे लागणार आहे. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखतीला जातानाच उमेदवारांना शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे वैद्यकीय अधिकार्यांचे प्रमाणपत्र सोबत न्यावे लागणार आहे. यापूर्वी अंतिम निवड झाल्यानंतरच उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जायची. राज्यस्तरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून वर्ग एक, दोन व तीनच्या अधिकार्यांची निवड केली जाते. त्यासाठी पूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यातून उमेदवारांची निवड केली जाते. अंतिम निवड झाल्यानंतर उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे की नाही, याची खात्री म्हणून उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाते. २0१४ पर्यंत अंतिम निवड झाल्यानंतरच उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जात होती. आता २0१५ या नववर्षापासून निवड प्रक्रीयेमध्ये महत्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. त्यानुसार मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना वैद्यकीय तपासणीचे प्रमाणपत्र मुलाखतीपूर्वीच सादर करणे सामान्य प्रशासन विभागाने सक्तीचे केले आहे. हे प्रमाणपत्र नसल्यास उमेदवाराला मुलाखत देता येणार नाही. त्यामुळे मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांना सक्षम वैद्यकीय प्राधिकार्याचे प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे. पूर्वीच्या पद्धतीमध्ये अंतिम निवड झाल्यानंतर प्रशिक्षणार्थी उमेदवाराची वैद्यकीय चाचणी केली जात होती. वैद्यकीय तपासणीत काही व्यंग आढळून आल्यास ते पद रिक्तच राहत होते. या पृष्ठभूमीवर हा बदल करण्यात आला आहे. त्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर वैद्यकीय प्रमाणपत्राचा नमुदा देण्यात आला आहे. त्या नमुन्यावर उमेदवाराने स्वत:चे छायाचित्र लावून सक्षम वैद्यकीय अधिकार्याची सही आणि शिक्का घेऊन ते मुलाखतीच्यावेळी सोबत आणणे बंधनकारक राहणार आहे.