‘मेडिकल’चे विद्यार्थी व पोलिस आमने-सामने!

By Admin | Updated: October 18, 2014 01:02 IST2014-10-18T01:02:31+5:302014-10-18T01:02:31+5:30

वाडेगाव येथील युवकाच्या मृत्यूनंतर राडा : शवविच्छेदन करण्यास डॉक्टरांचा नकार.

Medical and police students face-to-face! | ‘मेडिकल’चे विद्यार्थी व पोलिस आमने-सामने!

‘मेडिकल’चे विद्यार्थी व पोलिस आमने-सामने!

अकोला : वाडेगाव येथील एका २0 वर्षीय युवकाच्या मृत्यूप्रकरणाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर, विद्यार्थी आणि पोलिस शुक्रवारी आमने-सामने आले. योग्य उपचाराअभावी युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करून, युवकाच्या नातेवाइकांनी शिवीगाळ केल्यामुळे शवविच्छेदन करण्यास विद्यार्थी व डॉक्टरांनी नकार दिला. त्यामुळे प्रकरण चिघळल्याने पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात चार तास धुडगूस घातला. अकोला पोलिसांच्या विरोधात नारेबाजी करून, विद्यार्थ्यांनी संपही पुकारला. या गोंधळात युवकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जवळपास दिवसभर पडून होता.
वाडेगाव येथील रहिवासी, छायाचित्रकार नारायण सोनोने यांचा मुलगा अवी (२0) याने शुक्रवारी सकाळी विष प्राषण केले. अवीला तातडीने सवरेपचार रुग्णालयात भरती करण्यात आले. रुग्णालयात भरती केले, तेव्हा अवी सुस्थितीत होता, तो त्याच्या मामाशी बोलतही होता. भरती केल्यानंतर अवीला डॉक्टरांनी सलाईन लावले; मात्र त्यानंतर कोणतेही उपचार केले नाही. अवीच्या नातलगांनी डॉक्टरांना उपचार करण्याची विनंती वारंवार केली; मात्र डॉक्टर लक्ष देत नसल्याचे पाहून, नातलग चिडले. याच मुद्यावर त्यांच्यात वादही झाले; परंतु वादविवादापेक्षा उपचार महत्त्वाचे असल्याने नातलगांनी अवीला तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये हलविले. तेथील डॉक्टरांनी अवीला मृत घोषित केल्यानंतर, त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सवरेपचार रुग्णालयात आणण्यात आला. त्यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे १00 ते १५0 विद्यार्थी संपूर्ण तयारीतच होते. त्यांनी अवीचा मृतदेह आणलेले एम एच २८ बी ७३0८ क्रमांकाचे वाहन रुग्णालयात अडविले. त्यामुळे मृताचे नातेवाइक आणि डॉक्टर तसेच विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला. या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळताच, पोलिसांनी सवरेपचार रुग्णालय गाठले. पोलिसांनी डॉक्टरांना समजाविण्याचा प्रयत्न केला; मात्र डॉक्टरांनी पोलिसांशीही वाद घातला. त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांनी शवविच्छेदन करण्याची विनंती डॉक्टरांना केली; मात्र डॉक्टरांसह विद्यार्थ्यांनी आधी लाठीचार्ज करणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांवर कारवाई करा आणि मगच शवविच्छेदन करू, अशी मागणी केली. दोषी पोलिस कर्मचार्‍यांवर गुन्हे दाखल केल्याशिवाय शवविच्छेदन न करण्याचा निर्णय डॉक्टर व विद्यार्थ्यांनी घेतला.

Web Title: Medical and police students face-to-face!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.