जनसामान्यांच्या आरोग्यासाठी महाआरोग्य अभियान राबविणार!
By Admin | Updated: January 28, 2016 00:44 IST2016-01-28T00:44:03+5:302016-01-28T00:44:03+5:30
अकोल्याचे पालकमंत्री रणजित पाटील यांची घोषणा; १ फेब्रुवारी ते १५ मार्च दरम्यान अंमलबजावणी होणार.

जनसामान्यांच्या आरोग्यासाठी महाआरोग्य अभियान राबविणार!
अकोला: सार्वजनिक आरोग्य विभागाचे विविध उपक्रम तसेच शासनाच्या आरोग्यविषयक सेवा-सुविधा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी व जनतेत शासकीय आरोग्य सेवांबाबत विश्वास निर्माण व्हावा, यासाठी राज्यात १ फेब्रुवारी ते १५ मार्च या कालावधीत महाआरोग्य अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती मंगळवारी प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजवंदनानंतर मार्गदर्शन करताना अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांनी दिली. भारतीय प्रजासत्ताकाचा ६६ वा वर्धापन दिन समारंभ शास्त्री स्टेडीयमवर अत्यंत उत्साहात पार पडला. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते शासकीय मुख्य ध्वजारोहण झाले. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिणा, महापौर उज्जवलाताई देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शरद गवई, आ. गोपीकिशन बाजोरिया होते. यानंतर पालकमंत्र्यानी प्रजासत्ताकदिनाच्या सोहळ्यात संचलन करण्यासाठी सहभागी झालेल्या पोलीस व इतर पथकांची खुल्या जीपमधून पाहणी करून त्यांनी दिलेली मानवंदना स्वीकारली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंती वर्ष सामाजिक न्याय व समता वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. समाजामध्ये एकता, समता व बंधुता निर्माण होण्याच्या दृष्टीने सामाजिक न्याय विभागाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, या उपक्रमांचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. पाटील यांनी यावेळी केले. जिल्ह्यातील शेतकर्यांनी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा, असे सांगून जिल्ह्यातून कुशल मनुष्यबळ निर्माण होण्यासाठी युवकांसाठी प्रमोद महाजन कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. लघुउद्योगांना तसेच स्वयंरोजगारासाठी पंतप्रधान मुद्रा योजनेद्वारे शिशू, किशोर व तरुण योजनेंतर्गत ५0 हजार ते १0 लाख रुपयांपर्यंंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच केंद्र शासनाच्या पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, अटल पेंशन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना आदींचा लाभही जनतेने घ्यावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.