विवाहितेचा विनयभंग करणार्याची पतीकडून हत्या
By Admin | Updated: May 11, 2014 18:29 IST2014-05-11T18:03:25+5:302014-05-11T18:29:03+5:30
विवाहितेचा विनयभंग करणार्या इसमास तिच्या पतीने बेदम मारहाण केली.

विवाहितेचा विनयभंग करणार्याची पतीकडून हत्या
बोरगाव मंजू : वाशिंबा येथे विवाहितेचा विनयभंग करणार्या इसमास तिच्या पतीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या इसमाचा उपचारादरम्यान नागपूर येथे रविवार, ११ मे रोजी मृत्यू झाला. या प्रकरणी बोरगाव मंजू पोलिसांनी विवाहितेच्या पतीस अटक केली आहे.
बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणार्या वाशिंबा येथील एका शेतात गोडावूनचे बांधकाम सुरू आहे. मध्य प्रदेशातील देवरी शिंदवाडा येथील कुंजबिहारी जगदीश वर्मा हा २५ वर्षीय युवक या बांधकामावर चौकीदार म्हणून काम करतो. तो पत्नीसह तेथे वास्तव्यास आहे. याच बांधकामावर जामोद ताजळगाव येथील विष्णू विश्वनाथ इंगळे हा २५ वर्षीय तरुण काम करीत होता. शुक्र वार, ९ मे रोजी कंंुजबिहारीच्या पत्नीचा विनयभंग केल्याचा आरोप विष्णूवर करण्यात आला होता. पत्नीचा विनयभंग झाल्यामुळे रागाने लाल झालेल्या कुंजबिहारीने विष्णूला बांबूने बेदम मारहाण केली. या मारहाणीत विष्णू गंभीर जखमी झाला. कुंजबिहारीने स्वत:च बोरगाव मंजू पोलिसांत जाऊन घडलेला प्रकार सांगत विष्णूला मारहाण केल्याची कबुलीही दिली. ठाणेदार डी. के. आव्हाडे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून रात्रीच कंुजबिहारीविरुद्ध ३२६ कलमान्वये गुन्हा दाखल करीत त्याला ताब्यातही घेतले. दरम्यान, मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या विष्णू इंगळेला उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले; परंतु त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे डॉक्टरांनी त्याला नागपूर येथे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. नागपूर येथे उपचारादरम्यान विष्णूचा मृत्यू झाला. या प्रकरणी हेकाँ ताटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोरगाव पोलिसांनी कुंजबिहारीविरुद्ध कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणी ठाणेदार डी. के. आव्हाळे, हेकाँ शकील कुरेशी पुढील तपास करीत आहेत. मृतक विष्णूविरुद्धही कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे कळले आहे. (वार्ताहर)