विवाहितेचा छळ, सहायक पोलिस निरीक्षकाविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: November 13, 2014 01:17 IST2014-11-13T01:17:13+5:302014-11-13T01:17:13+5:30
उच्चशिक्षित नवविवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल.

विवाहितेचा छळ, सहायक पोलिस निरीक्षकाविरुद्ध गुन्हा
अकोला : उच्चशिक्षित नवविवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार बुधवारी सिव्हिल लाइन पोलिसांनी तिला मानसिक व शारीरिक त्रास दिल्याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षकासह त्याची आई व वहिनीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
नवविवाहिता दीपाली पुनीत कुलट हिने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा विवाह पोलिस खात्यातील सहायक पोलिस निरीक्षक पुनीत कुलट यांच्यासोबत ३0 मे २0१३ रोजी पार पडला. लग्नसमारंभामध्ये माहेरकडून कुलट यांना सोन्याच्या दागिन्यांसह हुंड्याच्या स्वरूपात मोठी रोख रक्कम देण्यात आली होती. लग्नानंतर काही महिने सुरळीत गेल्यानंतर पुनीत कुलट, त्यांची आई मीरा व वहिनी जया यांनी दीपाली हिला माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा लावला. परंतु, दीपाली त्यांची मागणी पूर्ण करीत नसल्याने त्यांनी दीपालीचा मानसिक व शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली. दीपाली हिने सासरच्यांचा छळ निमूटपणे सहन केला. परंतु, सासरकडील मंडळीकडून दीपालीचा अतोनात छळ होऊ लागल्याने तिने अखेर सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तिच्या तक्रारीनुसार पोलिसांनी पती पुनीत, सासू मीरा व वहिनी जया यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४९८ नुसार गुन्हा दाखल केला. कुलट हे दहशतवादी विरोधी पथकात (एटीएस) सहायक पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.