मराठा सेवा संघ करणार सिंहावलोकन

By Admin | Updated: August 30, 2014 01:17 IST2014-08-30T01:16:44+5:302014-08-30T01:17:10+5:30

मराठासेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार यांची अकोला येथे पत्रकार परिषदेत माहिती.

Maratha Seva Sangh's overview | मराठा सेवा संघ करणार सिंहावलोकन

मराठा सेवा संघ करणार सिंहावलोकन

अकोला : महाराष्ट्रातील मराठा समाजातील पोट जाती व बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संघटन, प्रबोधन, जागृती व प्रत्यक्ष कृती यासाठी १ सप्टेंबर १९९0 साली मराठा सेवा संघाची स्थापना करण्यात आली. याला आता १ सप्टेंबर रोजी २४ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त केंद्रीय कार्यकारिणी राज्यव्यापी दौरा करणार असून, २४ वर्षांतील कार्याचे सिंहावलोकन करणार असल्याची माहिती मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार यांनी शुक्रवारी येथील आर. टी.ओ. कार्यालयासमोरील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. पुरुषोत्त्तम तायडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष पंकज जायले यांची उपस्थिती होती. कामाजी पवार पुढे म्हणाले की, शिक्षणसत्ता, धर्मसत्ता, प्रचार-प्रसार माध्यम सत्ता व अर्थसत्ता या पाच सत्तांचा उपयोग बहुजन समाजासाठी झाला पाहिजे, यासाठी मराठा सेवा संघाने नेहमीच अग्रणी भूमिका घेतली आहे. या सत्तांना ताब्यात घेण्यासाठी जनमत तयार करण्याचे काम संघटना गत २४ वर्षांपासून करीत आहे. हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून प्रदेश महासचिव मधुकर मेहेकरे व अन्य पदाधिकार्‍यांसह आपण राज्यव्यापी दौरा करीत आहे. या दौर्‍याची सुरुवात विदर्भातून होत आहे. यादरम्यान विचारवंत, उद्योजक, शेतकरी व कार्यकर्ते यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांचे मत जाणून घेणे व त्या दृष्टीने मराठा सेवा संघाच्या चळवळीत योग्य बदल घडवून अधिक परिणामकारक व गतिशील वाटचाल होण्याच्या दृष्टीने हा दौरा आखण्यात आला आहे. मराठा सेवा संघाच्या पुढाकाराने मंत्रालयात राष्ट्रमाता मॉ जिजाऊची प्रतिमा लावणे, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणे व इतिहास संशोधन व बळीराजा संशोधन केंद्राच्या माध्यमातून खरा वास्तववादी इतिहास समोर आणण्याचे काम करीत असल्याची माहिती पवार यांनी दिली.

*१ सप्टेंबरला महाअधिवेशन
गेल्या २४ वर्षांतील मराठा सेवा संघाच्या कार्याचे मूल्यांकन त्रयस्थांकडून करून घेण्यासाठी व भावी वाटचालीची दिशा ठरविण्यासाठी तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय अधिवेशन होणार असून, अकोला येथे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त महाअधिवेशन १ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे.

Web Title: Maratha Seva Sangh's overview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.