कोपर्डी हत्याकांडाचा निषेधार्थ मराठा समाजाचा मोर्चा
By Admin | Updated: September 11, 2016 17:21 IST2016-09-11T17:21:59+5:302016-09-11T17:21:59+5:30
कोपर्डी हत्याकांडाचा निषेध नोंदविण्यासाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधील मराठा समाज एकजूट होत आहे.

कोपर्डी हत्याकांडाचा निषेधार्थ मराठा समाजाचा मोर्चा
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. ११- कोपर्डी हत्याकांडाचा निषेध नोंदविण्यासाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधील मराठा समाज एकजूट होत आहे. त्याअनुषंगाने वाशिम जिल्ह्यातही सकल मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने क्रांतीमोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे. या आंदोलनाच्या नियोजनासाठी रविवार ११ सप्टेंबर रोजी स्थानिक वाटाणे लॉन्स येथे आयोजित बैठकीला उपस्थित समाज बांधवांनी गर्दीचा उच्चाक मोडला. बैठकीत २५ सप्टेंबरला मोर्चा काढण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाºया आरोपींविरूध्द तातडीने दोषारोपपत्र दाखल करून आरोपींना फासावर लटकवावे, मागील दहा वर्षात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या मराठा समाजातील शेतक-यांच्या झाल्या असून, आत्महत्या केलेल्या मराठा समाजातील शेतक-यांच्या पाल्यांना नोकरीत समावून घ्यावे, ईबीसीची सवलत मर्यादा सहा लाखापर्यंत वाढवावी, ‘अॅक्ट्रॉसिटी अॅक्ट’मधील गंभीर बाबी काहीअंशी शिथिल करून कायद्यात सुधारणा करावी, यासह इतर विविध मागण्यांसाठी वाशिम येथे क्रांतीमोर्चा काढण्यात येणार आहे़
या क्रांतीमोर्चात जिल्ह्यातील लाखो समाजबांधव सहभागी व्हावेत, यासाठी गत १५ दिवसांपासून सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. समाजातील उद्योजक, व्यापारी, डॉक्टर, विधीज्ञ, प्राध्यापक, शिक्षकांसह शेतकरी, शेतमजुरांसह महिला, युवक-युवतींनी मोर्चात सहभागी व्हावे, यासाठी आवाहन केले जात आहे़ त्यानुषंगाने वाशिम येथील वाटाणे लॉन्स येथे रविवारी समाजबांधवांची मोठी बैठक पार पडली.
राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे वाशिम येथे देखील अतिविराट मोर्चा काढून मराठा समाजाने एकजूटीची क्रांती घडवून आणावी. शांततेच्या मार्गाने निघणाºया या क्रांतीमोर्चात समाजातील आबालवृद्धांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.