मालधक्का परिसरात जड वाहनांना प्रवेशबंदी!
By Admin | Updated: March 31, 2017 01:57 IST2017-03-31T01:57:17+5:302017-03-31T01:57:17+5:30
जिल्हाधिका-यांचा आदेश; रात्री ९ पर्यंत प्रवेशास मनाई.

मालधक्का परिसरात जड वाहनांना प्रवेशबंदी!
अकोला, दि. ३0- शहरातील रेल्वे स्टेशन भागात मालधक्का परिसरात सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत जड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गुरुवारी दिला.
अकोला शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात नागरिकांसह विद्यार्थ्यांची मोठय़ा प्रमाणात वर्दळ असते. याच परिसरात मालधक्का असल्याने जड वाहनांची वर्दळ असल्याने, या भागात अनेकदा अपघाताच्या घटना घडतात. भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता, रेल्वे स्टेशन भागातील मालधक्का ३१ मार्चपर्यंत इतरत्र हलविण्याचा ह्यअल्टिमेटमह्ण गत ५ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी रेल्वे प्रशासनास दिला होता. या पृष्ठभूमीवर शहरातील वाहतुकीच्या योग्य नियोजनासाठी मालधक्का येथून जड वाहतूक करणारी वाहने सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत बाहेर जाणार नाहीत, अशी विनंती महाराष्ट्र राज्य विकास माथाडी आणि जनरल कामगार संघटना व रेल्वे मालधक्का येथील सर्व माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि कामगारांच्या वतीने गत १६ मार्च रोजी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. त्यानुषंगाने ३0 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित संघटना, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रेल्वे प्रशासन आणि पोलीस विभागाच्या अधिकार्यांसह महाराष्ट्र राज्य विकास माथाडी आणि जनरल कामगार संघटना व ट्रान्सपोर्ट पदाधिकार्यांची बैठक घेण्यात आली.
या बैठकीतील चर्चेत ठरविण्यात आल्यानुसार रेल्वे स्टेशन भागातील मालधक्का परिसरात रात्री ९ ते सकाळी ७ या कालावधीतच जड वाहनांना प्रवेश राहणार असून, सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत जड वाहनांना प्रवेशबंदी राहणार असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिला. या बैठकीला पोलीस उपनिरीक्षक डी.जी. पोटभरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे प्रवीण महाडे, रेल्वे स्टेशन प्रबंधक जी.पी. मीणा, अ.वि. निमजे, माथाडी आणि जनरल कामगार संघटनेच्या अकोला शाखा अध्यक्ष साधना गावंडे, विनोद दळवी उपस्थित होते.