मनोरुग्ण मातेने दिला कन्यारत्नाला जन्म!
By Admin | Updated: April 16, 2015 00:34 IST2015-04-16T00:34:38+5:302015-04-16T00:34:38+5:30
खामगाव येथील प्रकार; चमुकलीसह मातेचे संगोपन करणार कोण?

मनोरुग्ण मातेने दिला कन्यारत्नाला जन्म!
खामगाव (जि. बुलडाणा) : समाजातील वासनांधांची शिकार झालेल्या एका मनोरूग्ण महिलेने गुरूवार ९ एप्रिल रोजी एका कन्या रत्नास जन्म दिला. मात्र, आई वेडसर, तिच्या कुटंबाचा ठावठिकाणा नाही, अशा परिस्थितीत आता त्या चिमुकलीसह मातेचे संगोपन कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेगाव येथील एक मनोरुग्ण महिला समाजातील वासनांधांची शिकार होवून गर्भवती राहिली. या अवस्थेत शेगाव येथील रस्त्यावर भटकत असताना काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तिला स्थानिक सईबाई मोटे रुग्णालयात दाखल केले. मात्र, सईबाई मोटे रुग्णालयाने या महिलेला अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयात ५ एप्रिल रोजी दाखल केले. या ठिकाणी उपचार सुरू असताना ९ एप्रिल रोजी तिचे सिंझरिंग करण्यात आले व तिने कन्येला जन्म दिला. दोघींचीही प्रकृती चांगली आहे. मंगळवारी शेगाव पोलिसांनी या चिमुकलीचा ताबा घेतला आहे.
*अकोला येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात प्रसुत झालेल्या मनोरुग्ण महिलेस बुधवार १५ एप्रिल रोजी सुटी मिळणार आहे. या महिलेला सुटी मिळाल्यानंतर तिच्या औषधोपचार आणि सांभाळाचा प्रश्न उपस्थित होणार आहे.
*मनोरुग्ण महिलेने जन्मास घातलेल्या पाच दिवसाच्या चिमुकलीच्या ताबा घेण्यासाठी शेगाव पोलिसांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला १४ एप्रिल रोजी पत्र दिले. या पत्रानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठांता यांनी सदर चिमुकली शेगाव पोलिसांच्या ताब्यात दिली.