मनपात शिवभक्तांचा ठिय्या
By Admin | Updated: September 5, 2015 01:50 IST2015-09-05T01:50:44+5:302015-09-05T01:50:44+5:30
पालखी मार्गाची दुरुस्ती, सुविधा देण्याची मागणी.

मनपात शिवभक्तांचा ठिय्या
अकोला: श्रावण महिन्यातील अखेरच्या सोमवारी (७ सप्टेंबर) शहरात कावड व पालखी उत्सवाचे आयोजन होत आहे. पालखी मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे शिवभक्तांना कमालीचा त्रास होणार असल्याने मनपाने तत्काळ खड्डे दुरुस्तीसह मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी राजेश्वर शिवभक्त मंडळ, शांतता समितीच्यावतीने शुक्रवारी मनपा आवारात ठिय्या आंदोलन छेडले. अखेर जिल्हा परिषदेचे ह्यसीईओह्ण एम. देवेंदरसिंह यांनी रस्ता दुरुस्तीसह इतर सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिल्यानंतर शिवभक्तांनी आंदोलन मागे घेतले. शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी गांधीग्राम येथून पूर्णा नदीच्या जलाने जलाभिषेक करण्यासाठी असंख्य कावडधारी शिवभक्त सज्ज झाले आहेत. पालखी मार्गावर खड्डे पडले असून, रस्त्यालगत प्रचंड घाण साचली आहे. पथदिवे व पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने भाविकांचे हाल होतील. त्यानुषंगाने श्री राजेश्वर शिवभक्त मंडळ व शांतता समितीच्यावतीने राज्यमंत्र्यांसह जिल्हाधिकारी तसेच मनपा प्रशासनाला शुक्रवारी निवेदन सादर करण्यात आले. यापूर्वी मनपाला निवेदन दिल्यावरही प्रशासनाने खड्डे न बुजविल्यामुळे संतप्त शिवभक्तांनी मनपा आवारात ठिय्या दिला. यावेळी बांधकाम विभागाचे उपअभियंता राजेश श्रीवास्तव यांनी रस्ता दुरुस्तीला सुरुवात करणार असल्याचे सांगितले. अखेर याच मुद्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदरसिंह यांनी मनपामध्ये येऊन शिवभक्तांना ठोस आश्वासन दिले.