२५ शिवभक्तांसह आज मानाचीच पालखी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:23 IST2021-09-06T04:23:54+5:302021-09-06T04:23:54+5:30
अकोला : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी (६ सप्टेंबर) रोजी अकोला शहरातील पालखी कावड महोत्सवात यंदाही २५ ...

२५ शिवभक्तांसह आज मानाचीच पालखी!
अकोला : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी (६ सप्टेंबर) रोजी अकोला शहरातील पालखी कावड महोत्सवात यंदाही २५ शिवभक्तांसह मानाचीच पालखी ठरावीक वाहनांतून पोलीस बंदोबस्तात सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत शहरातील श्री राजराजेश्वर मंदिरात पोहोचणार आहे. नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी श्री राजराजेश्वर मंदिरपासून गांधीग्रामपर्यंतच्या पालखी मार्गावर रविवारी रात्री १२ वाजतापासून सोमवारी रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अकोला शहरातील पालखी कावड महोत्सवात यंदाही मानाचीच पालखी २५ शिवभक्तांसह काढण्यास जिल्हा प्रशासनामार्फत परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार रविवार, ५ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजता श्री राजराजेश्वर मंदिरपासून २५ शिवभक्तांसह मानाची पालखी पोलीस बंदोबस्तात गांधीग्राम येथे पूर्णा नदीतील जल आणण्यासाठी मार्गस्थ झाली. सोमवार, ६ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत ठरावीक वाहनांतून पोलीस बंदोबस्तात मानाची पालखी अकोला शहरातील श्री राजराजेश्वर मंदिरात पोहोचणार असून, शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला जलाभिषेक करण्यात येणार आहे. मानाच्या पालखीत सहभागी २५ शिवभक्तांची कोरोना चाचणी करण्यात आली असून, सर्वांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आहे, तसेच संबंधित २५ शिवभक्तांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्याची खात्री प्रशासनामार्फत करण्यात आली. पालखी कावड मार्गावर भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी श्री राजराजेश्वर मंदिरपासून गांधीग्रामपर्यंत पालखी मार्गावर रविवारी रात्री १२ वाजतापासून सोमवारी रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे, असे अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डाॅ. नीलेश अपार यांनी सांगितले.