हिवतापमुक्त जिल्ह्याच्या दिशेने वाटचाल!

By Admin | Updated: April 25, 2017 01:15 IST2017-04-25T01:15:01+5:302017-04-25T01:15:01+5:30

आज जागतिक हिवताप दिन : तीन वर्षांत रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट

Malaria is moving towards the district! | हिवतापमुक्त जिल्ह्याच्या दिशेने वाटचाल!

हिवतापमुक्त जिल्ह्याच्या दिशेने वाटचाल!

अतुल जयस्वाल - अकोला
मनुष्याची प्राणहानी करणाऱ्या आजारांमध्ये हिवतापाचा (मलेरिया) क्रमांक बऱ्याच वरचा असून, दरवर्षी जगात या आजाराने अनेकांचा मृत्यू होतो. हिवताप ही एक महत्त्वाची समस्या असून, या रोगाच्या उच्चाटनासाठी २०३० पर्यंत हिवतापमुक्तीचे धोरण ठरविण्यात आले असून, यामध्ये अकोला जिल्ह्याने आघाडी घेतल्याचे गत तीन वर्षांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. जिल्ह्यात गत तीन वर्षांत हिवताच्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सातत्याने घट झाली आहे.
हिवतापाने दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतो. विशेषत: आफ्रिका खंडात या रोगाने मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. हिवतापाबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने दरवर्षी २५ एप्रिल हा जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षीची थिम ‘ए पूश फॉर प्रिव्हेंशन’ ही आहे. ‘अ‍ॅनाफिलिस’ या डासांच्या मादीपासून हिवतापाचा प्रसार होतो. मलेरियाचे चार प्रकार आहेत. यामध्ये प्लास्मोडियम व्हायवॅक्स, प्लास्मोडीयम फॅल्सिपेरम, प्लास्मोडियम मलेरिया व प्लास्मोडीयम ओव्हेल यांचा समावेश आहे.
यापैकी प्लास्मोडीयम फॅल्सिपॅरम या आजारात वेळीच उपचार घेतला नाही, तर मृत्यू होण्याची शक्यता असते. भारतात प्लास्मोडियम व्हायवॅक्स, प्लास्मोडीयम फॅल्सिपेरम या प्रकारचे जंतू आढळतात. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत हिवतापाबाबत जनजागृती करण्यात येऊन रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येतो. आरोग्य विभागामार्फत घरोघरी सर्वेक्षण करून तापाच्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांचे रक्त नमुने घेतले जातात. हिवताप निष्पन्न झालेल्या रुग्णांना क्लोरोक्विनच्या गोळ्या देऊन उपचार केले जातात.
तसेच डासांची उत्पत्ती होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजले जातात. गत तीन वर्षांत हिवतापावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभागाला बऱ्याच प्रमाणात यश मिळाले आहे. वर्ष २०१५ मध्ये हिवतापाचे १७९ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर वर्ष २०१६ मध्ये केवळ ९२ रुग्ण आढळून आले, तर यावर्षी मार्च अखेरपर्यंत हिवतापाचे केवळ नऊ रुग्ण समोर आले आहेत. रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याने जिल्हा लवकरच हिवताप मुक्त घोषित होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

२०२० पर्यंत हिवतापमुक्तीचे लक्ष्य
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने राज्यातील सर्वच जिल्ह्यांना हिवतापमुक्त होण्यासाठी ठरावीक वर्षापर्यंतचे लक्ष्य दिले आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील गत तीन वर्षांमधील रुग्णांची संख्या बघू जाता जिल्ह्यासाठी २०२० पर्यंत हिवतापमुक्तीचे लक्ष्य देण्यात आले आहे. हे लक्ष्य गाठण्यात यश येणार असल्याचे दिसते.

हिवताप हा आजार होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचे आहेत. नागरिकांनी डासांची उत्पत्ती होऊ नये, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. हिवतापाच्या उच्चाटनासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे.
- डॉ. अभिनव भुते, जिल्हा हिवताप अधिकारी, अकोला.

Web Title: Malaria is moving towards the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.