मजीप्राच्या कार्यकारी अभियंत्याकडे मनपाचा प्रभार?
By Admin | Updated: March 27, 2015 01:28 IST2015-03-27T01:28:38+5:302015-03-27T01:28:38+5:30
रिक्त पदांसाठी शासन स्तरावरून प्रयत्न.

मजीप्राच्या कार्यकारी अभियंत्याकडे मनपाचा प्रभार?
अकोला : शहर पाणीपुरवठा योजना सुरळीत चालवण्यासाठी महापालिकेच्या जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता पदाचा प्रभार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता एस.हुंगे यांच्याकडे दिला जाणार असून, उर्वरित अभियंता, शाखा अभियंत्यांची रिक्त पदे भरण्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. मनपाचे तत्कालीन आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी १७ फेब्रुवारी २0१४ रोजी आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारताच वरिष्ठ अधिकार्यांच्या रिक्त पदांसाठी शासनाकडे २१ फेब्रुवारी रोजी पत्रव्यवहार केला. उपायुक्तपदासाठी थेट दयानंद चिंचोलीकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती, हे विशेष. त्यावेळी चिंचोलीकरांच्या नावाला हिरवा कंदील मिळाला आणि बँकेवर प्रशासक पदाचा अनुभव असलेल्या चिंचोलीकर यांनी स्वायत्त संस्थेच्या उपायुक्तपदाची मोठी जबाबदारी स्वीकारली. वरिष्ठ अधिकार्यांची पदे रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाजात एकसूत्रता नाही. उपायुक्त चिंचोलीकरांच्या नियुक्तीनंतर उर्वरित रिक्त पदांसाठी शासनाकडे पाठपुरावा करणे क्रमप्राप्त होते. मनपाच्या साहाय्यक आयुक्तपदी माधुरी मडावी रुजू झाल्यानंतर २६ जानेवारीपासून उपायुक्त दयानंद चिंचोलीकर दीर्घ रजेवर आहेत. ११ फेब्रुवारी २0१५ रोजी सोमनाथ शेटे यांनी आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रिक्त पदांसाठी त्यांनीदेखील शासनाकडे पत्रव्यवहार केला. शहराची पाणीपुरवठा योजना सुरळीत चालवण्यासाठी जलप्रदाय विभागातील अधिकार्यांची रिक्त पदे तातडीने भरणे गरजेचे झाले. सदर बाबी लक्षात घेता, रिक्त पदांवर अधिकार्यांची नेमणूक करण्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे.