टपालमतपेट्या रामभरोसे
By Admin | Updated: May 8, 2014 00:50 IST2014-05-08T00:50:25+5:302014-05-08T00:50:49+5:30
मतपेटी वार्यावर सोडल्याचा धक्कादायक प्रकार

टपालमतपेट्या रामभरोसे
वाशिम: सुरक्षित मतदानाचा डांगोरा पिटणार्या निवडणूक विभागाने टपाल मतांसाठी ठेवलेली मतपेटी मात्र बिनधास्तपणे वार्यावर सोडल्याचा धक्कादायक प्रकार लोकमतने केलेल्या स्टिंग मधून स्थानिक तहसिल कार्यालयात ५ मे रोजी उघडकीस आला. निवडणूक विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांना टपाल मतांविषयी किती गांभिर्य आहे हेही या निमित्ताने उजागर झाले आहे.
यवतमाळ -वाशिम लोकसभा मतदार संघामध्ये १0 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. सदर प्रक्रियेत सहभागी असलेल्या शासकीय व निमशासकीय कर्मचार्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा या साठी निवडणूक विभागाने नेहमीप्रमाणे यावेळीही टपाल मतदानाची व्यवस्था केलेली आहे. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सदर कर्मचारी व अधिकार्यांना या टपाल मतपत्रिका वितरित करण्यात आल्या आहेत. सद्या सदर मतपत्रिका गोळा करण्याचे काम सुरू झाले असुन यासाठी तहसिल कार्यालयाच्या निवडणूक विभागात एक पेटी ठेवण्यात आली आहे. सदर पेटीत काही मतपत्रिकाही पडल्या आहेत. मात्र धक्कादायक बाब म्हणजे आजमितीला वाशिम तहसिल कार्यालयाच्या निवडणूक विभागात ठेवण्यात आलेली मतपेटीच रामभरोसे आहे. लोकमतने केलेल्या स्टिंग ऑपरेशनने ही बाब अधोरेखित केली आहे. कुणीही यावे अन् टपाल मतांसाठी ठेवलेली पेटी घेऊन पसार व्हावे असाच काहीसा प्रकार या ठिकाणचा झालेला आहे. अधिकारी व कर्मचार्यांना या पेटीच्या सुरक्षितेचे किंचीतही गांभिर्य दिसून येत नाही.