महावितरणच्या अमरावती परिमंडळाच्या विभाजनाचे संकेत!

By Admin | Updated: February 27, 2015 00:28 IST2015-02-27T00:28:44+5:302015-02-27T00:28:44+5:30

अमरावतीला होणार नवे परिमंडळ ?

Mahavitaran's split of Amravati circle! | महावितरणच्या अमरावती परिमंडळाच्या विभाजनाचे संकेत!

महावितरणच्या अमरावती परिमंडळाच्या विभाजनाचे संकेत!

राजरत्न सिरसाट/अकोला : वीज वितरण कंपनीच्या (महावितरण) अकोला येथील परिमंडळाचे विभाजन करण्याचे प्रयत्न शासन स्तरावर सुरू असून, अमरावतीला नवे परिमंडळ होणार असल्याचे वृत्त आहे. या संदर्भात राज्याच्या ऊर्जा मंत्रालयाने माहिती घेतली आहे.
पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ आणि अमरावती हे पाच जिल्हे अकोला येथील महावितरण मुख्यालयांतर्गत आहे. एक परिमंडळ म्हणजेच मुख्यालय होण्यासाठी जवळपास १२ ते १५ लाख ग्राहकांची गरज असते. याचाच अर्थ एका जिल्हय़ात (सर्कल) जवळपास ३ लाखांच्यावर वीज ग्राहक हवेत. तेव्हाच त्या ठिकाणी मुख्य अभियंता अर्थात परिमंडळ मुख्यालयाची स्थापना केली जाते. अकोला परिमंडळात सात अधीक्षक अभियंते आहेत. यातील दोन अधीक्षक अभियंते हे पायाभूत प्रकल्पाचे काम पाहतात. एका सर्कलमध्ये ग्रामीण आणि शहर असे दोन कार्यकारी अभियंते असतात. या परिमंडळात दहा कार्यकारी अभियंते आहेत. पण अकोला येथील मुख्यालयाचे विभाजन केल्याने अमरावती येथे होणार्‍या परिमंडळात एवढे ग्राहक आहेत का, हा प्रश्न येथील महावितरणच्या कर्मचार्‍यांमध्ये उपस्थित होत आहे.
अकोला परिमंडळाचे विभाजन करू न अमरावती आणि यवतमाळ या दोन जिल्हय़ाचे नवे परिमंडळ अर्थात मुख्यालय अमरावती येथे केले जाणार आहे. उर्वरित अकोला, बुलडाणा आणि वाशिम हे तीन जिल्हे अकोला मुख्यालयाशी संलग्नित राहतील. याकरिता ऊर्जा मंत्रालयाने माहिती घेतली आहे. या परिमंडळात दोन लाखांच्यावर कृषिपंपाचा अनुशेष असूून, अनेक वीज विकासाची कामे रखडली आहेत. शेकडो गावे अजूनही भारनियमनाच्या झळा सोसत आहेत. या पूष्ठभूमीवर कामे गतीने आणि सुरळीत होण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाने हा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.
राज्यात सध्या भांडूप, औरंगाबाद, अकोला, नागपूर, नागपूर ग्रामीण, नाशिक, पुणे, कल्याण, रत्नागिरी, कोल्हापूर, लातूर, जळगाव, बारामती, नांदेड असे १४ महावितरणचे परिमंडळ कार्यालय आहेत. नाशिक परिमंडळाचे विभाजन करू न यापूर्वी जळगाव येथे परिमंडळ कार्यालय झालेले आहे. अकोला परिमंडळाचे विभाजन झाल्यास राज्यात हे महावितरणचे १५ वे परिमंडळ कार्यालय असेल.
राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरणच्या अकोला परिमंडळ कार्यालयाच्या विभाजनाची चर्चा सुरू असेल पण शासन स्तरावर अद्याप अकोला परिमंडळाच्या विभाजनाबाबत कोणताच निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले.

Web Title: Mahavitaran's split of Amravati circle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.