राजेश्‍वरनगरीत महादेवाचा गजर

By Admin | Updated: February 18, 2015 02:13 IST2015-02-18T02:02:27+5:302015-02-18T02:13:41+5:30

महाशिवरात्री उत्साहात साजरी, राजेश्‍वराची निघाली रथयात्रा.

Mahadeva alarm in Rajeshwaragarh | राजेश्‍वरनगरीत महादेवाचा गजर

राजेश्‍वरनगरीत महादेवाचा गजर

अकोला : शहराचे आराध्य दैवत तसेच सांस्कृतिक वैभव असलेल्या राजराजेश्‍वर मंदिरासह अन्य महादेवाच्या मंदिरांमध्ये मंगळवारी महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. या मंदिरांमध्ये दिवसभर भक्तांची मांदियाळी होती.
जुन्या शहरातील राजराजेश्‍वर मंदिराला प्राचीन इतिहास आहे. शेकडो वर्षांपासून या मंदिरात मोठय़ा उत्साहात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात येतो. सोमवारी रात्री बारा वाजतापासूनच राजराजेश्‍वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती. भाविकांनी जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक करून अखंड रामायणाचे सामूहिक वाचन केले. सकाळपासून तर रात्रीपर्यंत तरुण तसेच लहान मुलांनी आपल्या परिसरातून पालखी काढून राजेश्‍वर मंदिराची प्रदक्षिणा केली. रात्री महाआरती करण्यात आली. मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. विविध फळे व लहान मुलांच्या खेळण्यांची दुकाने सजली होती. सायंकाळी ५.३0 वाजता महादेवाची रथयात्रा चांदीच्या रथावरून काढण्यात आली. ही रथयात्रा किल्ला परिसरापासून जागृतेश्‍वर मंदिर, जयहिंद चौक, दगडी पूल, रायली जिन, पिंपळेश्‍वर महादेव मंदिर, टिळक मार्ग, मोठे राम मंदिर मार्गाने राजेश्‍वर मंदिरात पोहोचली. रथयात्रेदरम्यान शिवभक्तांच्या बम-बम भोलेच्या जयघोषात राजेश्‍वरनगरी दुमदुमली. विविध ठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले. तसेच फराळाचे वाटप करण्यात आले. यासोबतच रणपिसेनगरमधील बारा ज्योतिर्लिंग मंदिर, खोलेश्‍वर महादेव, जागृतेश्‍वर, जागेश्‍वर, माणकेश्‍वर, राणी सती धाममधील शिव मंदिर, आळशी प्लॉटमधील सिद्धेश्‍वर, कौलखेडमधील चैतन्येश्‍वर मंदिरासह शहरातील विविध मंदिरांमध्ये हजारो भक्तांनी महादेवाचे दर्शन घेतले. डाबकी रोड परिसरातील विश्‍वमानव मंदिरात रुद्रस्वाहाकार यज्ञ पार पडला. माणकेश्‍वर मंदिरात भजनांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील रणपिसे नगरमधील बाराजोर्तिलिंग मंदिरामध्येही दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. मोठा भावभक्तीने पूजा करण्यात आली. भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

Web Title: Mahadeva alarm in Rajeshwaragarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.