माफसू, कृषी विद्यापीठातील नोकरभरतीत मराठा, मुस्लीम आरक्षण

By Admin | Updated: July 23, 2014 00:58 IST2014-07-23T00:58:29+5:302014-07-23T00:58:29+5:30

कृषी विद्यापीठांनी नव्याने नोकरभरती करताना मराठा, मुस्लिम उमेदवारांना आरक्षणानुसार अर्ज करण्याची तरतूद केली आहे;

Mafsu, Maratha Employee in Agriculture University, Muslim Reservation | माफसू, कृषी विद्यापीठातील नोकरभरतीत मराठा, मुस्लीम आरक्षण

माफसू, कृषी विद्यापीठातील नोकरभरतीत मराठा, मुस्लीम आरक्षण

अकोला: राज्यातील महाराष्ट्र पशू विज्ञान(माफसू) व कृषी विद्यापीठांनी नव्याने नोकरभरती करताना मराठा, मुस्लिम उमेदवारांना आरक्षणानुसार अर्ज करण्याची तरतूद केली आहे; परंतु शासनाच्या सामान्य प्रशासनाकडून यासंदर्भात कोणतेच आदेश नसल्याने या आरक्षणानुसार नोकरीसाठी अर्ज करणार्‍या या उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मराठा, मुस्लिम आरक्षणाच्या अधिसुचनेनंतर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व महाराष्ट्र पशू विज्ञान विद्यापीठात प्रथमच सुमारे ३00 पदांसाठी नोकरभरती करण्यात येत आहे. यात डॉ. पंदेकृविची १४३ तर माफसूची १५४ पदे आहेत. २0११ व २0१३ च्या बिंदु नामावलीनुसार सहयोगी अधिष्ठाता, प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापकांची पदे माफसू भरणार आहे. डॉ. पंदेकृविचेही वरिष्ठ व कनिष्ठ संशोधन सहाय्यक नोकरभरतीसाठीचे रोस्टर जुनेच आहे. यात ओबीसी १९, अनुसूचित जाती १३, अनुसूचित जमाती ७, एबीसी २, विमुक्ती जाती ३, भटक्या जाती (बी)-२.५, भटक्या जाती (सी) ३.५, तर भटक्या जाती( डी) या प्रवर्गासाठी २ टक्के असे एकूण ५४ टक्के आरक्षण आहे. दरम्यान, राज्य शासनाने मराठा तसेच मुस्लिमांना शिक्षण आणि नोकर्‍यांमध्ये अनुक्रमे १६ व ५ टक्के आरक्षण देण्याची अधिसूचना जारी केली; पण त्यासंदर्भातील अधिकृत आदेश अद्याप या विद्यापीठांना प्राप्त झाले नाहीत. इत:पर या दोन्ही विद्यापीठांनी नोकरभरतीसाठी काढलेल्या जाहिरातीमध्ये मराठा, मुस्लिम उमेदवारांनी नव्या आरक्षणानुसार अर्ज करण्याची सूचना केली आहे. त्यासाठी या उमेदवारांना जात व इतर प्रमाणपत्रे अर्जासोबत सादर करावी लागणार आहेत; मात्र विद्यापींठांनी असे अर्ज स्वीकारले तरी सामान्य प्रशासन विभागाचे आदेश अद्याप या विद्यापीठांना प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे नवीन आरक्षणानुसार अर्ज करणार्‍या उमेदवारांचा भ्रमनिरास होण्याची शक्यता आहे. मराठा, मुस्लिम आरक्षणासंदर्भातील आदेश या विद्यापीठाला नोकरभरतीपूर्वी प्राप्त झाले, तर या दोन्ही विद्यापीठांना बिंदु नामावलीनुसार बदल करावे लागणार आहेत. त्यानुसार मराठा १६ व मुस्लिम उमेदवारांसाठी ५ टक्के आरक्षणाची तरतूद करून, रोस्टर नव्याने करावे लागणार आहे. या प्रक्रीयेत दोन्ही विद्यापीठाची नोकरभरती लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Mafsu, Maratha Employee in Agriculture University, Muslim Reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.