अभिवादनासाठी लोटला जनसागर
By Admin | Updated: April 15, 2015 01:50 IST2015-04-15T01:50:31+5:302015-04-15T01:50:31+5:30
‘जय भीम’ने दणाणले अकोला शहर.

अभिवादनासाठी लोटला जनसागर
अकोला : भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंतीदिनी त्यांना आदरांजली अर्पित करण्यासाठी मंगळवारी पहाटेपासूनच नागरिकांची लगबग सुरू झाली होती. शहरातील चौकाचौकांमध्ये डॉ. आंबेडकर व महात्मा फुले यांच्या प्रतिमा मांडून भावपूर्ण आदरांजली अर्पित करण्यात आली. अशोक वाटिका परिसरामध्ये तर या दोन्ही महामानवांना वंदन करण्यासाठी जनसागर लोटला होता. राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांची येथे रीघ लागली होती. डॉ. बाबासाहेब आणि महात्मा फुले यांच्या जयंतीच्या शुभ पर्वावर अशोक वाटिकेमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या स्थळाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. वाचनीय पुस्तके, थोर पुरुषांच्या प्रतिमा, मूर्तींसोबतच खाद्यपदार्थ, हार-फुलांचे स्टॉल येथे होते. विविध सामाजिक संस्थांच्यावतीने परिसरामध्ये महाप्रसाद, जलसेवा, सरबताची व्यवस्था करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत अशोक वाटिका परिसरामध्ये नागरिकांनी गर्दी केली होती. यासोबतच शहरातील भीमनगर, न्यू भीमनगर, पंचशीलनगर, हरिहरपेठ, रमाबाईनगर, कृषीनगर, आकोटफैल, गुलजारपुरा, रमेशनगर, कौलखेड, खडकी, उमरी, डॉ. आंबेडकरनगर, सातव चौक, दिवेकर चौक, रेल्वे कॉलनी, नागमणी कॉलनी आदी परिसरात कार्यक्रम आयोजित केले होते.