तोतया पोलिसाने वृद्ध दाम्पत्याला लुटले
By Admin | Updated: March 9, 2015 01:54 IST2015-03-09T01:54:47+5:302015-03-09T01:54:47+5:30
भाड्यासाठी पैसे देऊन पोलिसांनी लावले परतवून.

तोतया पोलिसाने वृद्ध दाम्पत्याला लुटले
अकोला: लग्नासाठी अहेर घेण्यासाठी अकोल्यात आलेल्या वृद्ध दाम्पत्याला एका युवकाने पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्याकडील एक हजार रुपये काढून घेतले आणि पसार झाला. ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास मोठय़ा राममंदिराजवळ घडली. केळीवेळी येथे राहणारी गयाबाई शंकर नंदाने (६५) ही तिच्या पतीसह लग्नाचा अहेर व आंदण खरेदी करण्यासाठी दुपारी अकोल्यात आली. अहेर खरेदी केल्यानंतर हे वृद्ध दाम्पत्य टिळक रोडवरील मोठय़ा राममंदिराजवळ आले. या ठिकाणी त्यांना एका युवकाने अडवून, पोलीस असल्याची बतावणी केली आणि तुमच्याकडे काय आहे, असे विचारल्यावर त्याने वृद्धाची अंगझडती घेतली आणि त्यांचे खिशातील एक हजार रुपये काढून घेतले. घटनेची तक्रार देण्यासाठी वृद्ध दाम्पत्य कोतवाली पोलीस ठाण्यात आले; परंतु पोलीस ठाण्यासमोरच उभ्या असलेल्या पोलीस कर्मचार्यांनी त्यांची बाहेरूनच चौकशी करून त्यांना पळवून लावले. वृद्ध महिला रडून रडून घटना सांगत होती. गावाला जाण्याइतपतही भाड्याला पैसे नसल्याचे गार्हाणे तिने पोलिसांकडे मांडले; परंतु तक्रार टाळण्यासाठी वृद्ध दाम्पत्याला भाड्यासाठी १00 रुपये दिले आणि त्यांना तक्रार देण्यापासून परावृत्त करून परतवून लावले.