व्यापा-याला मारहाण करून लुटली साडेपाच लाखांची रोकड
By Admin | Updated: November 14, 2014 01:09 IST2014-11-14T01:02:00+5:302014-11-14T01:09:13+5:30
अकोल्यातील दूध डेअरीजवळ भरदिवसा घडला प्रकार.

व्यापा-याला मारहाण करून लुटली साडेपाच लाखांची रोकड
अकोला : दुकानावर जाण्यासाठी घरून निघालेल्या बिडी व्यापार्यावर लोखंडी पाइपने हल्ला करून त्यांच्याकडील साडेपाच लाख रुपयांची रोकड लुटल्याची घटना गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास तोष्णीवाल ले-आउटमधील शनी मंदिराजवळ घडली. दुचाकीवर आलेल्या अज्ञात युवकांनी व्यापार्यावर हल्ला करून त्यांच्याकडील रोकड असलेली बॅग हिसकली आणि ते पसार झाले. दिवसाढवळय़ा घडलेल्या या प्रकाराने चोरट्यांचे बळ वाढल्याचे स्पष्ट केले आहे.
तोष्णीवाल ले-आउट परिसरामध्ये राहणारे पंकज जयंतीभाई पटेल (४८) यांचे टिळक रोडवरील श्रावगी टॉवर्समध्ये शारदा उद्योग नावाचे प्रतिष्ठान आहे. नेहमीप्रमाणे पंकज पटेल हे दुकानावर जाण्यासाठी सकाळी ११ वाजताच्या सुमारास एमएच ३0 एजे ६६३0 क्रमांकाच्या मोटारसायकलने बाहेर पडले. तोष्णीवाल ले-आउटमधील शनी मंदिराजवळ आल्यावर दुचाकीवर असलेल्या तीन अज्ञात युवकांनी अचानक त्यांच्या लोखंडी पाइपने हल्ला चढविला. बेसावध असल्याने पटेल हे वाहनासह जागेवर कोसळले. अधिक वेळ न दडवता, अज्ञात युवकांनी त्यांच्या हातातील बॅग हिसकून पळ काढला. दरम्यान घटनास्थळावर इतर व्यापारीही पोहोचले. त्यांनी सिव्हिल लाइन पोलिस ठाण्याशी संपर्क साधून घटनेबाबत माहिती दिली. पटेल यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात युवकांवर भादंवि कलम ३९२(३४) नुसार गुन्हा दाखल केला. व्यापार्यांनीच जखमी अवस्थेतील पंकज पटेल यांना पोलिस ठाण्यात नेले. त्यानंतर लगेच त्यांना सर्वोपचार रुग्णालय व नंतर खासगी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी लुटारूंना पकडण्यासाठी शोधमोहीम हाती घेतली आहे. अद्याप पोलिसांना काहीही सुगावा लागला नाही.