ऑक्सिजनची सुविधा असलेल्या खासगी रुग्णवाहिकांकडून लूट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:19 IST2021-04-21T04:19:03+5:302021-04-21T04:19:03+5:30
रवी दामोदर लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, जिल्हावासीयांच्या चिंतेत भर पडली आहे. ...

ऑक्सिजनची सुविधा असलेल्या खासगी रुग्णवाहिकांकडून लूट!
रवी दामोदर
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, जिल्हावासीयांच्या चिंतेत भर पडली आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध असलेल्या खासगी रुग्णवाहिकांकडून रुग्णांच्या नातेवाइकांची लूट सुरू असल्याचे चित्र आहे. खासगी रुग्णवाहिका चालकांकडून ५०० मीटरसाठी ३,५०० ते ३,८०० रुपये भाडे आकारण्यात येत असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
कोरोनाच्या संकटाबरोबरच वातावरणातील बदलांमुळे खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. गंभीर रुग्ण रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी किंवा मृतदेह रुग्णालयातून घरी नेण्यासाठी अनेकांवर पदरमोड करण्याची वेळ येत आहे. परिवहन विभागाने दर ठरवून दिलेले असताना जास्तीचे भाडे आकारले जात आहे; मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. गरजू रुग्णांच्या नातेवाइकांची लूट सुरू असून, बहुसंख्य रुग्णवाहिका सेवेच्या नावावर व्यवसाय करीत असल्याचे चित्र आहे. शहरातून ग्रामीण भागात रुग्ण नेण्यासाठी ऑक्सिजन सुविधा असलेल्या खासगी रुग्णवाहिका चालकांकडून जवळपास १० ते १२ हजार रुपयांपर्यंत भाडे वसूल केले जात असल्याचे चित्र आहे.
---------------------------------
तक्रार कुठे करायची?
खासगी रुग्णवाहिकांविरुद्ध कुठे तक्रार करण्याचीही सोय नसल्याने तक्रार कुठे करायची, हाच मोठा प्रश्न आहे.
रुग्णवाहिका वेळेवर मिळाली, हेच मोठे भाग्य, असे म्हणून अनेक नातेवाईक रुग्णवाहिका चालकांनी आकारलेले भाडे कमी करत नाहीत किंवा त्याविषयी जास्त विचारपूस करत नाहीत.
ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णाची परिस्थिती अत्यंत गंभीर असते. त्यामुळे त्यांचे नातेवाईकही घाबरलेले असतात. परिणामी, नातेवाईक काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतात.
------------------------------
तापडिया नगर, खरप बु.
गंभीर रुग्णांना शहरातील रुग्णालयातून तापडीया नगर किंवा खरप बु. येथे नेण्यासाठी ऑक्सिजन सेवा उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिका चालकांकडून १८०० ते २२०० रुपये भाडे आकारण्यात येत आहे.
---------------------------
मलकापूर
मलकापूर परिसरात रुग्ण नेण्यासाठी रुग्णवाहिका चालकांकडून २८०० ते ३००० रुपये भाडे आकारण्यत येत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना नाहक आर्थिक भुदंड सहन करावा लागत आहे.
--------------------------------
बायपास, हिंगणा
बायपास तसेच हिंगणाकडे गंभीर रुग्ण नेण्यासाठी रुग्णवाहिका चालकांकडून ३५०० ते ३८०० रुपयांपर्यंत भाडे आकारण्यात येते. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन कारवाईची मागणी होत आहे.