लोकमत अकोला आवृत्तीचा वर्धापन दिन सोहळा थाटात
By Admin | Updated: March 18, 2016 02:22 IST2016-03-18T01:57:43+5:302016-03-18T02:22:03+5:30
आवृत्तीच्या नूतन मुख्य कार्यालयाचे उद्घाटन, मान्यवरांची मांदियाळी.

लोकमत अकोला आवृत्तीचा वर्धापन दिन सोहळा थाटात
अकोला : व-हाडच्या मातीशी, शेतकर्यांशी जिवाभावाचे नाते जोडलेल्या 'लोकमत'च्या अकोला आवृत्तीचा १८ वा वर्धापन दिन सोहळा बुधवारी मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात पार पडला. यावेळी स्नेहनगर (गीतानगर) स्थित 'लोकमत'च्या मुख्य कार्यालयाचे रीतसर उद्घाटनही करण्यात आले. या स्नेहमीलन सोहळय़ास सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांनी हजेरी लावून 'लोकमत'वर शुभेच्छांचा वर्षाव केला.
'लोकमत'च्या अकोला आवृत्तीचा १८ वा वर्धापन दिन आणि नूतन मुख्य कार्यालयाचे उद्घाटन असा दुग्धशर्करायोग यावेळी जुळून आला. नूतन मुख्य कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी फीत कापून केले. यावेळी महापौर उज्ज्वला देशमुख, माजी महापौर सुमनताई गावंडे, ह्यलोकमतह्णच्या जाहिरात विभागाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख आसमान सेठ, अकोला आवृत्तीचे निवासी संपादक रवि टाले, सहायक महाव्यवस्थापक रमेश डेडवाल, 'लोकमत समाचार'चे प्रभारी अरुणकुमार, उप वृत्तसंपादक राजू ओढे आदी उपस्थित होते. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून 'लोकमत'चा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
स्नेहमीलन सोहळय़ास माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, माजी राज्यमंत्री अजहर हुसैन, ज्येष्ठ नाट्यकलावंत राम जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई, उपमहापौर विनोद मापारी, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. 'लोकमत' कार्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या स्नेहमीलन सोहळय़ाला 'संगीत रजनी'ने स्वरसाज चढवला. सेव्हन स्टार म्युझिकल ग्रुपच्या गायकांनी सादर केलेल्या गीतांनी कार्यक्रमाला रंगत चढली.
उपविभागीय अधिकारी खडसे आणि घोंगडेंच्या गीतांची रंगत
स्नेहमीलन सोहळय़ातील 'संगीत रजनी'चा स्वरसाज ऐकून उपविभागीय अधिकारी संजय खडसे आणि व्यंगचित्रकार गजानन घोंगडे यांनाही गाण्याचा मोह आवरला नाही. एक कुशल अधिकारी म्हणून ख्यातिप्राप्त असलेल्या खडसे यांच्यातील दडलेला गायक यानिमित्ताने उपस्थितांनी प्रत्यक्ष अनुभवला. घोंगडे यांच्यातील व्यंगचित्रकार, नकलाकार अकोलेकरांनी नेहमीच अनुभवला; परंतु 'लोकमत'च्या वर्धापन दिन सोहळय़ामध्ये घोंगडे यांनी बहारदार गायन करून उपस्थितांची मने जिंकली. रेषांना हसरं करून त्यांना साज चढविणार्या घोंगडे यांनी स्वरांनाही यावेळी साज चढविला.