वीज वितरण कार्यालयाला ठोकले कुलूप
By Admin | Updated: December 10, 2014 01:28 IST2014-12-10T01:28:28+5:302014-12-10T01:28:28+5:30
मूर्तिजापूरच्या राष्ट्रशक्ती हम संघटनेसह वीज ग्राहकांनी केले आंदोलन.

वीज वितरण कार्यालयाला ठोकले कुलूप
मूर्तिजापूर (अकोला) : वीज वितरण कंपनीचे अधिकारी वीजजोडण्या देण्यास त्रास देत असल्यामुळे संतापलेले वीजग्राहक व शेतकर्यांसह राष्ट्रशक्ती हम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवार, ९ डिसेंबर रोजी स्थानिक वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला कुलूप ठोकून तीव्र निषेध व्यक्त केला.
वीज वितरण कंपनीचे मूर्तिजापूर येथील अधिकारी सामान्य नागरिकांना जोडण्या देण्याकरिता नाहक त्रास देतात, ही नित्याचीच बाब आहे. मंगळवार, ९ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते २ वाजताच्या दरम्यान मूर्तिजापूर येथील कार्यालयात एकही अधिकारी व कर्मचारी उपस्थित नव्हता. तेथे आपल्या खोळंबलेल्या कामासाठी आलेले शेतकरी आणि ग्राहक हे अधिकारी व कर्मचारी येण्याची वाट पाहत ताटकळत बसले होते. नेमके याच वेळी राष्ट्रशक्ती हम संघटनेचे पदाधिकारी तेथे पोहोचले. त्यांनी तेथील परिस्थिती व शेतकरी व ग्राहकांची होणारी गैरसोय पाहून गैरहजर अधिकारी व कर्मचार्यांच्या मनमानीचा निषेध करीत वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला ताला ठोको आंदोलन केले.
त्यांनी कार्यालयाला कुलूप ठोकल्याची माहिती कंपनीच्या अधिकार्यांना मिळाली. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या प्रकरणी यशस्वी मध्यस्थी केल्यानंतर दुपारी ३ वाजता हे आंदोलन मागे घेण्यात आले. तथापि, संबंधित अधिकारी व कर्मचार्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी संघटनेने व उपस्थित शेतकर्यांनी केली. या आंदोलनाची माहिती नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात विधानसभेत उपस्थित आमदार हरीश पिंपळे यांना कळताच त्यांनी फोनवरून संबंधित अधिकार्याची चांगलीच कानउघाडणी केली.