पशुधन अधिका-यांना मुख्यालयाची ‘अँलर्जी’

By Admin | Updated: April 1, 2017 03:05 IST2017-04-01T03:05:13+5:302017-04-01T03:05:13+5:30

अकोला जिल्ह्यातील सात केंद्रे आढळली बंद, बाळापुरात खासगी व्यक्ती करते उपचार.

Livestock Officers 'Allergy' | पशुधन अधिका-यांना मुख्यालयाची ‘अँलर्जी’

पशुधन अधिका-यांना मुख्यालयाची ‘अँलर्जी’

अकोला, दि. ३१- पशुधनावर भिस्त असलेल्या शेतकर्‍यांचे पशुधनच पशुवैद्यकीय अधिकार्‍यांच्या बेजबाबदारपणामुळे वार्‍यावर सोडल्याचे चित्र ह्यलोकमतह्णने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये जिल्हय़ात सर्वदूर दिसून आले. विशेष म्हणजे, कायद्याने पशुधन विकास अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाशिवाय पर्यवेक्षकांनी वैद्यकीय उपचार करण्यास बंदी आहे. त्याचवेळी पशुधन विकास अधिकारी मुख्यालयी उपस्थितच राहत नसल्याने पर्यवेक्षकांनाच जनावरांवर वैद्यकीय उपचाराची सक्ती करण्याचा विरोधाभासही दिसून आला.
एकीकडे कायद्याच्या बडग्याने पर्यवेक्षकांना कमी लेखायचे, तर दुसरीकडे दबावातून त्यांच्याकडूनच उपचार करून घेण्याचा उद्दामपणाही जिल्हय़ात सुरू आहे. त्यातही पशुधन विकास अधिकारी मुख्यालयी न राहताच चार ते सहा हजार रुपये घरभाडे भत्त्यापोटी लाटत असल्याचेही पुढे आले आहे. पशुधन विकास अधिकारी संवर्गातीलच सर्व वरिष्ठ अधिकारी असल्याने त्यांची दादागिरी सर्वत्र खपवून घेतली जात आहे. त्यांना आवर न घातल्यास जिल्हय़ातील पशुधनाला फटका सातत्याने बसतच राहील, अशी भीतीही व्यक्त होत आहे.
बाळापुरातील लघू पशु चिकित्सालयात खासगी व्यक्ती उपचार करीत असल्याचा प्रकार समोर आला.
जिल्हय़ातील पशु चिकित्सालयात सुरू असलेला सावळा गोंधळ उघड करण्यासाठी लोकमतने जिल्हाभरातील २५ पशु चिकित्सालयात २९ मार्च रोजी एकाच वेळी स्टिंग राबवले. या स्टिंगमध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. बाळापूर येथील लघू पशु चिकित्सालयात खासगी व्यक्ती गुरांवर उपचार करीत असल्याचे आढळले. दुर्गवाडा येथे पशुधन अधिकार्‍यांचे पद रिक्त असल्याने पर्यवेक्षक व परिचरच रुग्णांवर उपचार करीत असल्याचे समोर आले. बाश्रीटाकळी तालुक्यातील कान्हेरी सरप येथे भेट दिली असता, पशुधन अधिकारी सराळा येथे गेल्याची माहिती मिळाली. वास्तविक पाहता सराळा हे गाव कान्हेरी सरपंच्या कार्यक्षेत्रातच येत नाही. तेल्हारा तालुक्यातील अडगाव बु.येथील पशु चिकित्सालयात औषधांचा प्रचंड तुटवडा आहे. पशुपालकांना खासगी औषध दुकानांमधून औषध विकत आणावे लागते. या स्टिंगदरम्यान ११ पशु चिकित्सालयात पशुधन अधिकारी उपस्थित असल्याचे तसेच स्वत: उपचार करीत असल्याचे आढळले.

हे पशुधन अधिकारी करतात अप-डाउन
सस्ती, वाडेगाव, उगवा, कुरूम, कान्हेरी सरप, पारस, अडगाव बु., बोरगावमंजू आणि महान.

ही पशु चिकित्सालये आढळली बंद
महान, वरखेड देवदरी, पिंपळखुटा, भटोरी, अंदुरा, उमरा, कान्हेरी सरप.

हे पशुधन अधिकारी होते उपस्थित
आलेगाव, हिवरखेड, उगवा, जामठी बु., मुंडगाव, पारस, धाबा, तेल्हारा, दानापूर, बोरगावमंजू आणि अडगाव बु.

Web Title: Livestock Officers 'Allergy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.