कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 15:09 IST2020-01-25T15:08:56+5:302020-01-25T15:09:24+5:30
डम्पिंग ग्राउंडजवळ पिसाळलेल्या चार ते पाच कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला करीत त्याचे लचके तोडण्यास सुरुवात केली.

कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी
अकोला: नायगाव परिसरात चार ते पाच पिसाळलेल्या कुत्र्यांनी एका पाच वर्षीय चिमुकल्यावर हल्ला करीत त्याचे लचके तोडले. ही धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास डम्पिंग ग्राउंड परिसरात घडली. जखमी मुलावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहे.
नायगावस्थित संजय नगर येथील रहिवासी शेख अवैस कुरेशी नासिर कुरेशी नामक पाच वर्षीय चिमुकला शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास जवळच असलेल्या बालवाडीतून घरी जात होता. दरम्यान, डम्पिंग ग्राउंडजवळ पिसाळलेल्या चार ते पाच कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला करीत त्याचे लचके तोडण्यास सुरुवात केली. चिमुकल्याचा आवाज येताच परिसरातील नागरिकांनी त्याला कुत्र्याच्या तावडीतून सोडविले अन् सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकल्याच्या चेहरा अन् पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशीच घटना २१ आॅगस्ट २०१९ रोजी जुने शहरातील पोळा चौकात घडली होती.
कोंडवाडा विभाग निष्क्रिय
या घटनेनंतर महापालिकेच्या कोंडवाडा विभाग निष्क्रिय असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरू असून, नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. २१ आॅगस्ट २०१९ रोजीदेखील अशीच घटना घडली होती; मात्र त्यानंतरही शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांचा सुळसुळाट आहे. दुसरीकडे महापालिकेचा कोंडवाडा विभाग निष्क्रिय आहे.