साहित्य संमेलने संस्काराची दालने व्हावीत

By Admin | Updated: December 13, 2014 00:07 IST2014-12-13T00:07:51+5:302014-12-13T00:07:51+5:30

हरिभाऊ वेरूळकर यांचे प्रतिपादन :अकोला येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाला थाटात प्रारंभ.

Literary conventions should be done in the syllabus of Sanskar | साहित्य संमेलने संस्काराची दालने व्हावीत

साहित्य संमेलने संस्काराची दालने व्हावीत

अकोला : आज सुसंस्कारांची कमतरता सर्वच क्षेत्रात जाणवत आहे. ज्या शिक्षण क्षेत्रातून संस्काराची अपेक्षा केली जाते, त्यानेदेखील संस्काराची नाळ तोडली आहे. अशा परिस्थितीत साहित्य संमेलनांमधून संस्काराचा विचार प्रतिपादीत होणे गरजेचे आहे; कारण साहित्य संमेलन हा एक लोकोत्सव आहे, यातून विचारांचे सिंचन होते. संस्काराची जबाबदारी आता साहित्यिकांनी आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे. सर्वच साहित्य संमेलने ही संस्काराची दालने झाली पाहिजेत, असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराचे आजीवन प्रचारक आचार्य हरिभाऊ वेरुळकर यांनी शुक्रवारी अकोल्यात व्यक्त केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीच्यावतीने आयोजित दुसर्‍या राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आचार्य वेरुळकर बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन अमरावती येथील प्राचार्य डॉ. पी.आर. राजपूत यांच्या हस्ते झाले. मंचावर शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. गजानन नारे, महापौर उज्वला देशमुख, उपमहापौर विनोद मापारी, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, गुरुदेव सेवा मंडळाचे उप सर्वाधिकारी रुपराव वाघ, ज्येष्ठ प्रचारक लक्ष्मण नारखेडे, भाई प्रदीप देशमुख, डॉ. पुरुषोत्तम तायडे, अँड. रामसिंग राजपूत, आमले महाराज, डॉ. ज्ञानेश्‍वर मिरगे, सुधाताई जवंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रसंताचे विचार म्हणजे सर्व संतांचे विचार, त्यामुळे हे संमेलन सर्व संतांच्या विचारांचे संमेलन असल्याचे वेरुळकर यांनी यावेळी सांगितले. आजची समाज व्यवस्था सुधारावी, असे वाटत असेल, तर राष्ट्रसंतांच्या विचारांशिवाय पर्याय नाही, असेही ते म्हणाले.
साहित्य संमेलन चौकटबद्ध करु नका. सर्वांना यात सामावून घ्या; कारण राष्ट्रसंतांना सर्वसमावेशक विचार प्रिय होते, असे डॉ. राजपूत यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितले. यावेळी रुपराव वाघ, प्रा. संजय खडसे, महापौर उज्वला देशमुख व उपमहापौर विनोद मापारी यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. गजानन नारे यांनी केले. संचालन रामेश्‍वर बरगट यांनी, तर आभार प्रा. अभिजीत गहूकर यांनी मानले. दुपारच्या सत्रात दोन परिसंवाद व राष्ट्रसंतांच्या भजनांचे सादरीकरण झाले. रविवारी या तीन दिवसीय संमेलनाचा समारोप होणार आहे.

Web Title: Literary conventions should be done in the syllabus of Sanskar