बुलडाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा
By Admin | Updated: February 11, 2015 23:58 IST2015-02-11T23:58:21+5:302015-02-11T23:58:21+5:30
गहू, हरभरा, संत्रा पिकांचे सर्वाधिक नुकसान.

बुलडाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा
बुलडाणा : जिल्ह्याला १0 फेब्रुवारीच्या रात्री वादळी वार्यासह अवकाळी पावसाने तडाखा दिला. आधीच दुष्काळाने होरपळलेल्या शेतकर्यांना रबी पिकांच्या नुकसानामुळे मोठा तडाखा बसला आहे. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना मोठा फटका बसला असून, हजारो हेक्टरवरील गहू, हरभर्याचे पीकक्षेत्र प्रभावित झाले आहे. जिल्ह्यातील बुलडाणा, मेहकर, लोणार, शेगाव, खामगाव, जळगाव जामोद, मलकापूर तालुक्यात वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये गहू, हरभरा, मका, आंबा, शाळू, कांदा तसेच बागायती क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. बुलडाणा तालुक्यातील धाड, रुईखेड मायंबा, मोताळा तालुक्यांतील कोथळी, इब्राहिमपूर येथे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाल्याची नोंद आहे. वादळी पावसामुळे शेतकर्यांवर अस्मानी संकट कोसळले. वादळी वार्यामुळे जिल्ह्यातील बर्याच शहरांतील वीजपुरवठा रात्रभर खंडित होता. बुलडाणा तालुक्यातील मायंबा, रुईखेड येथे तब्बल तासभर गारपीट झाल्याने उभ्या पिकांचे नुकसान झाले. जिल्हाभरात बुधवारी सकाळपर्यंत ५४.३0 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली. या अतवृष्टीने शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण सुरू केले आहे.