पत्नीला जाळल्याप्रकरणी जन्मठेप

By Admin | Updated: December 25, 2014 01:49 IST2014-12-25T01:27:12+5:302014-12-25T01:49:41+5:30

अकोला जिल्ह्यातील घटना.

Life saving case for burning wife | पत्नीला जाळल्याप्रकरणी जन्मठेप

पत्नीला जाळल्याप्रकरणी जन्मठेप

अकोला : किळकोळ वादातून पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जाळणार्‍या पतीस जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एन. तांबी यांनी बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
बाश्रीटाकळी तालुक्यातील पिंपळखुटा येथील प्रल्हाद निनाजी भालेराव (५७) याचे पत्नी पार्वताबाई (४५) हिच्यासोबत नेहमीच वाद होत असत. तो पत्नीला शिवीगाळ व मारहाण करीत असे. ३ जून २0१३ रोजी प्रल्हाद व पार्वताबाई हे धाबा शिवारात शेतीच्या कामावर गेले होते. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ते पिंपळखुटा येथे परतले. त्यानंतर त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्याचवेळी प्रल्हादने रॉकेलची कॅन पार्वताबाईच्या अंगावर ओतली आणि तिला पेटवून दिले. यात ती ५७ टक्के जळाली. तिला अकोला येथे सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ भरती केले होते. तिच्या जबाबावरून बाश्रीटाकळी पोलिसांनी प्रल्हादविरुद्ध भादंविचे कलम ३0७ नुसार गुन्हा दाखल करून, त्याला अटक केली. पार्वताबाईचा मृत्यू २३ जून २0१३ रोजी झाला. त्यानंतर पोलिसांनी पतीवर भादंवि कलम ३0२ नुसार गुन्हा दाखल केला. बाश्रीटाकळीचे तत्कालीन ठाणेदार डी. आर. भोज यांनी या प्रकरणाचा तपास करून, न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एन. तांबी यांच्या न्यायालयात प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने पाच साक्षीदार तपासले. सबळ पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी प्रल्हाद भालेराव याला जन्मठेप व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सहायक सरकारी विधिज्ञ विनोद फाटे यांनी, तर आरोपीतर्फे अँड. आशीष देशमुख यांनी बाजू मांडली.

*महत्त्वाचा साक्षीदारच फितुर
पार्वताबाईने रुग्णालयामध्ये एका साक्षीदारासमोर तोंडी मृत्युपूर्व जबाब दिला; परंतु सुनावणीदरम्यान हा साक्षीदारच न्यायालयात फितुर झाला. महत्त्वाचा साक्षीदारच फितुर झाल्याने आरोपी निर्दोष सुटण्याची शक्यता होती; परंतु न्यायालयाने उर्वरित तीन साक्षीदारांच्या साक्षीवर विश्‍वास ठेवून महत्त्वाचा निर्णय दिला.

Web Title: Life saving case for burning wife