मधुचंद्राच्या रात्रीच पत्नीचा खून करणा-या आरोपीस जन्मठेप
By Admin | Updated: March 24, 2015 00:52 IST2015-03-24T00:24:54+5:302015-03-24T00:52:53+5:30
अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस सुनावली जन्मठेप आणि दंडाची शिक्षा.

मधुचंद्राच्या रात्रीच पत्नीचा खून करणा-या आरोपीस जन्मठेप
आकोट (जि. अकोला) : लग्नामध्ये मान आणि साहित्य मिळाले नाही, या कारणावरुन मधुचंद्राच्या रात्री पत्नीचा गळा दाबून खून करणार्या पतीला जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावली. तेल्हारा तालुक्यातील दहीगाव येथील आरोपी मोहन सारंगधर वरखडे (२५) याचा १८ फेब्रुवारी २0१३ रोजी सीमासोबत विवाह झाला होता. मधुचंद्रानंतर २२ फेब्रुवारी रोजी सकाळी सीमा मृतावस्थेत आढळून आली होती. याबाबत आरोपीचा भाऊ प्रमोद वरखडे याने पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदविल्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. तपासादरम्यान मृतक सीमाचे वडील राजू कवळे यांनी आरोपीने आपल्या मुलीचा गळा दाबून खून केल्याची फिर्याद दिली. तसेच सीमाचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे वैद्यकीय अहवालात निष्पन्न झाले. त्यानुसार आरोपी मोहन वरखडे विरुद्ध भादंवि कलम ३0२ (खून), ३0४ (ब), ४९८ (अ) (छळ करणे) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. खटल्याची सुनावणी न्यायमूर्ती एस. डब्ल्यू. चव्हाण यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे ५ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. सरकार पक्षाचे पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी मोहन वरखडे याला जन्मठेप आणि ५000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.