सहका-याची हत्या करणा-या आरोपीस जन्मठेप
By Admin | Updated: April 1, 2017 03:02 IST2017-04-01T03:02:04+5:302017-04-01T03:02:04+5:30
किरकोळ वादातून दगड घातला डोक्यात.
_ns.jpg)
सहका-याची हत्या करणा-या आरोपीस जन्मठेप
अकोला, दि. ३१- चिलिम ओढण्याच्या वादातून सहकार्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या करणारा आरोपी मनिष मदनलाल जोशी(४0) याला शुक्रवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.झेड. ख्वाजा यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
मोहता मिल चाळमधील तपे हनुमान मंदिराजवळ राहणारे गजानन रामकिसन कौशल(४२) आणि त्यांचा सहकारी मनिष मदनलाल जोशी हे मंदिरातच साफसफाईचे काम करायचे. दोघेही व्यसनाधिन होते. अनेकदा त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद व्हायचा. २२ ऑक्टोबर २0१५ ला दसर्याच्या दिवशी रात्री दोघांमध्ये चिलिम ओढण्याच्या कारणावरून वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने, आरोपी मनिषने गजाननच्या डोक्यावर दगड घातला. यात गजानन गंभीर जखमी झाला. गजानन रक्ताच्या थारोळय़ात पडलेला पाहून मनिष जोशी घाबरला आणि त्याने परिसरातील नागरिकांना गजानन जखमी झाल्याची माहिती दिली. गजाननचा पुतण्या लखन सुरेश कौशल(२८) याने ऑटोरिक्षा बोलावून तातडीने गजानन कौशल याला रामदासपेठ पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर त्याला सर्वोपचार रुग्णालयात भरती केले. उपचारादरम्यान रात्री १ वाजताच्या सुमारास जखमी गजाननचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून तेथील रहिवाशांचे जबाब नोंदविले. त्यांच्या जबाबामध्ये रात्रीच्यावेळी गजाननजवळ जाताना मनिष जोशी याला पाहिल्याचे काहींनी पोलिसांना सांगितले. लखन कौशल याच्या तक्रारीनुसार रामदासपेठ पोलिसांनी आरोपी मनिष जोशी याच्याविरुद्ध भादंवि कलम ३0२ नुसार गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक तिरूपती राणे यांनी प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. शुक्रवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.झेड. ख्वाजा यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सरकार पक्षाने बारा साक्षीदार तपासले. साक्ष व पुरावे ग्राहय़ मानून न्यायालयाने आरोपी मनिष जोशी यास जन्मठेप, पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सहायक सरकारी विधिज्ञ आनंद गोदे यांनी बाजू मांडली.
श्वानाने ओळखला आरोपी
गजाननची हत्या केल्यानंतर आरोपी मनिषने गजानन जखमी झाल्याचा बनाव करून नागरिकांना माहिती दिली होती; परंतु पोलिसांना गजाननची हत्या केल्याचा संशय होता. त्यासाठी त्यांनी श्वान पथकाला पाचारण केले. श्वानाला रक्ताने माखलेल्या दगडाचा वास देण्यात आला. त्यानंतर श्वानाने आरोपी मनिष जोशीवर झडप घेतली आणि त्याच्यावर भुंकण्यास सुरुवात केल्यावर मनिषच्या चेहर्यावरील हावभाव बदलले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यावर त्याची चौकशी केली. चौकशीत त्याने हत्या केल्याची कबुली दिली.