अपहरणप्रकरणी दोघांना जन्मठेप

By Admin | Updated: November 20, 2015 02:20 IST2015-11-20T02:20:42+5:302015-11-20T02:20:42+5:30

खामगाव येथील कल्पेश राजोरे अपहरण प्रकरण.

The life imprisonment for both of them | अपहरणप्रकरणी दोघांना जन्मठेप

अपहरणप्रकरणी दोघांना जन्मठेप

खामगाव: सुमारे तीन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी आठ वर्षीय बालक कल्पेश राजोरे याच्या अपहरणप्रकरणी येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने भगवान फंदाट आणि माधव कापडे या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. १९ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने हा निकाल दिला. खामगाव येथील ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे यांचा आठ वर्षीय मुलगा कल्पेश याचे २0 सप्टेंबर २0११ मध्ये संगीत वर्गाची शिकवणी आटोपून तो घरी परत येत असताना सायंकाळी दुचाकीवर आलेल्या दोघांनी अपहरण केले होते. सोबतच त्याचे वडील राजेश राजोरे यांना कल्पेशच्या सुटकेसाठी तीन कोटी रुपयांची मागणीही मोबाइलवरून केली होती. या संपूर्ण प्रकाराबाबत कल्पेशच्या कुटुंबीयांनी लगोलग पोलिसांना माहिती दिली होती; परंतु पैशाच्या मागणीला प्रतिसाद मिळत नसल्याने आरोपींनी कल्पेशच्या हातपाय व तोंडाला चिकटपट्टी लावून खामगाव-शेगाव रोडवरील लासुरा फाट्याजवळील बस थांब्यासमोर असलेल्या विहिरीत रात्री आठ ते नऊ वाजेच्या सुमारास त्याला टाकले होते; मात्र थोडेफार पोहणे येत असल्याने तथा चिकटपट्टय़ा पाण्यामुळे सैल झाल्यामुळे कल्पेशने विहिरीतील पाइपाचा आधार घेत मदतीसाठी आरडाओरड केली होती. त्यावेळी शेगाव येथून आलेल्या बसमधून उतरलेल्या महादेव बोचरे या वृद्ध व्यक्तीला त्याचा आवाज आला. अंधारामुळे त्यास विहिरीत काही दिसले नाही; मात्र विहिरीत महिला पडली असल्याचा कयास लावून त्याने नजीकच्याच कांचन ढाब्यावर धाव घेऊन माहिती दिली होती. ढाब्यावर जेवण करत असलेले शेगाव इंजिनियरिंग कॉलेजचे प्रा. धनराज धोत्रे, खामगाव येथील सिद्धिविनायक कॉलेजचे दीपक जोहरी तसेच प्रा. अनिल अंमलकार, निशांत लबडे, धीरज तुळसकर, दीपक देवकते, संतोष मळसणे यांनी विहिरीकडे धाव घेऊन प्रा. धनराज धोत्रे व शिपाई दीपक जोहरी यांनी कल्पेशला विहिरीतून सुखरूप बाहेर काढले होते. या प्रकरणी तपासात पोलिसांनी कल्पेशने दिलेल्या माहितीनुसार स्थानिक एका वृत्तपत्र कार्यालयातील शिपाई भगवान गजानन फंदाट (२१, रा. जुना फैल खामगाव) व त्याच्या सांगण्यावरून या प्रकरणातील दुसरा आरोपी माधव रवींद्र कापडे (२३, रा. देशमुख प्लॉट) या दोघांना अटक केली होती. झटपट श्रीमंत होण्याच्या लोभापायी या दोघांनी कल्पेशचे अपहरण केल्याची कबुली तपासात पोलिसांना दिली होती. प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात पोलिसांनी संगनमताने फूस लावून बालकाचे अपहरण करणे, खंडणीची मागणी, जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तपासाअंती तत्कालीन ठाणेदार यू. के. जाधव यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते.

Web Title: The life imprisonment for both of them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.