लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला : पर्यावरणाचा ऱ्हास, पावसाची अनियमितता आणि दुष्काळावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी व शिर्लाच्या प्रत्येकांनी वृक्ष लागवड करणे अनिवार्य केले आहे. तसा ठरावच शिर्ला ग्रामसभेने पारित केला आहे. या ठरावात वृक्ष लावाल, तरच मिळेल दाखला, असे नमूद करण्यात आले आहे. यामुळे वृक्ष लागवडीस प्रोत्साहन मिळणार आहे.शिर्ला ग्रामपंचायत सरपंच रिना संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत ‘एक दाखला एक झाड’ असा ठराव भारत वृक्ष क्रांतीचे जनक ए. एस. नाथन यांच्या निर्देशानुसार घेण्यात आला आहे. त्याखेरीज कुणाला कोणताही ग्रा. पं. मधील कोणताही दस्तावेज दिला जाणार नाही. जर कोणत्याही कारणाने नागरिकास वृक्ष लागवड करणे शक्य नसल्यास वृक्ष रोपणासाठी ५० रुपये ग्रामपंचायतीच्या कार्यालयात जमा करावे लागतील. त्या रकमेतून प्रशासन संबंधित व्यक्तीच्या नावे वृक्षारोपण करण्यात येईल. यावर्षी पावसाळ्यात ३५०० वृक्षारोपण करण्याचे ध्येय ग्रामपंचायत प्रशासनाचे असल्याचे ग्रामसेवक राहुल उंदरे यांनी सांगितले. सरपंच रिना संजय शिरसाट म्हणाल्या, की पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नागरिकांनी या पावसाळ्यात शेतीच्या बांधावर, घरासमोर तथा गावातील मोकळ्या जागेत झाडे लावावीत आणि जगवावीत. असे करणाऱ्या नागरिकांना सन्मानित करण्यात येईल, असे सरपंचांनी सांगितले.
वृक्ष लावाल, तरच मिळेल दाखला!
By admin | Updated: May 24, 2017 19:59 IST