सख्यांनी घेतले व्यक्तिमत्त्वाचे धडे
By Admin | Updated: July 29, 2014 20:21 IST2014-07-29T20:21:10+5:302014-07-29T20:21:10+5:30
लोकमत सखी मंच व अस्पायरचे आयोजन

सख्यांनी घेतले व्यक्तिमत्त्वाचे धडे
अकोला : महिलांचे विश्व चूल आणि मूल एवढय़ापुरतेच र्मयादित असल्याची परंपरा या देशात मानल्या गेली; परंतु महिलांचेदेखील एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या या व्यक्तिमत्त्वाला त्यांना स्वत:लाच फुलविता येऊ शकते, हे सांगण्याचा सुरेख प्रयत्न अस्पायरचे संचालक सचिन बुरघाटे यांनी शनिवारी प्रमिलाताई ओक हॉलमध्ये केला.
लोकमत सखी मंच व अस्पायर एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ह्यमीट युअर सेल्फह्ण एक व्यक्तिमत्त्व विकास सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. या सेमिनारमध्ये अस्पायरचे संचालक सचिन बुरघटे यांनी बदलत्या काळानुसार गरज ओळखून स्वत:मध्ये कसे व काय बदल करावे, आर्थिक सक्षमतेसोबत मानसिक सक्षमता निर्माण कशी करावी, वेळेचे योग्य नियोजन आणि मूल्यमापन कसे करावे, विपरीत परिस्थितीत घ्यायची निर्णय क्षमता आणि कार्यपद्धतीचा विचार, कुटुंब आणि समाज यातील समन्वय साधण्याची कला, सुसंवादाने सहज सुटणार्या अनेक समस्यांचे मार्गदर्शन, आदी विषयांवर विस्तृत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचा आरंभ दीपप्रज्वलन व लोकमतचे संस्थापक जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमा पूजनाने झाला. याप्रसंगी मंचावर मानव स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँन्ड पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रदीप खांडवे, आयकर अधिकारी रुपा धांडे, खंडेलवाल अलंकार केंद्राच्या पुष्पा खंडेलवाल, लोकमत अकोला आवृत्तीचे निवासी संपादक रवी टाले व अस्पायरचे संचालक सचिन बुरघाटे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना सचिन बुरघाटे यांनी माणूस शब्दांनी व विचारांनी नाही, तर कर्माने मोठा होतो, असे सांगितले. आम्ही आमची क्षमता ओळखली पाहिजे. मोठय़ा गोष्टी नुसत्या डोक्यात ठेवून उपयोगाच्या नाहीत, तर त्या आचरणात आणल्या पाहिजेत. अहंकारामुळे हृदयाची दारे उघडी होतात. त्यामुळे अहंकार दूर सारून ज्ञानाची ऊर्जा शरीरात साठवा, असे आवाहन सचिन बुरघाटे यांनी केले. स्वत:चे निर्णय स्वत:च्या क्षमतेवर घ्या, चांगल्या लोकांशी जुळा, दिवसातील ६ तास स्वत:साठी काढा, स्वत:ला ओळखा आणि स्वत: ला समजा, असे आवाहन सचिन बुरघाटे यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन शुभांगी डांगे यांनी केले. यावेळी प्रशस्ती लोहिया हिचा सीए. सीपीटी. परीक्षेत देशातून दहावी आल्याबद्दल सत्कार करण्यात आला. जुलै महिन्यात वाढदिवस असणार्या सख्यांच्या हस्ते यावेळी केक कापण्यात आला. आभार सखी मंच संयोजिका मिनाक्षी फिरके यांनी केले.
** सख्यांची तुफान गर्दी
व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे आणि तेही स्वतंत्रपणे महिलांसाठी मिळत असल्याची माहिती मिळताच सख्यांनी प्रमिलाताई ओक हॉलमध्ये तुफान गर्दी केली होती. हॉल गच्च भरला होता. हॉलच्या व्हरांड्यातदेखील अनेक सख्यांनी खाली बसून कार्यक्रमाचा आनंद घेतला. हॉलबाहेरदेखील अनेक महिला उभ्या होत्या. कार्यक्रमाची प्रवेशिका मिळविण्यासाठी सख्यांची लोकमतच्या कार्यालयात रविवारपासून रीघ लागली होती. जवळपास ५00 सख्यांना प्रवेशिका न मिळाल्याने परत जावे लागले.