सर्वपक्षीय दिग्गजांची अकोल्याकडे पाठ
By Admin | Updated: October 14, 2014 01:41 IST2014-10-14T01:41:45+5:302014-10-14T01:41:45+5:30
मोठय़ा नेत्यांच्या सभाच नाहीत, स्थानिकांच्या खांद्यावरच प्रचाराचा भर.

सर्वपक्षीय दिग्गजांची अकोल्याकडे पाठ
अकोला : सध्या राज्यात निवडणुकीचे वारे वाहत असून, दिग्गज नेत्यांच्या सभा व दौरे संपूर्ण महाराष्ट्रभर आयोजित करण्यात येत आहेत. अकोल्याकडे मात्र एकही दिग्गज नेता फिरकला नसून, जिल्हा वाळीत टाकल्यासारखी गत झाली आहे. नेत्यांनी वार्यावर सोडल्यामुळे सैरभैर झालेल्या उमेदवारांनी प्रचाराची धुरा स्वत:च्याच खांद्यावर घेतली आहे. अकोला जिल्ह्यात विधानसभेच्या पाच जागा आहेत. यापैकी दोन जागा भाजप, दोन भारिप तर एका जागेवर शिवसेनेचा आमदार आहे. या विधानसभा निवडणुकीत सेना- भाजप व काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात सर्वच पक्षांनी उमेदवार रिंगणात उतरविले. आता प्रचाराचा धुराळा उडेल व राष्ट्र, राज्य पातळीवरील नेते जिल्ह्यात येतील, अशी अपेक्षा होती. मात्र, निवडणुकीत जिल्ह्याकडे सर्वच मोठय़ा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सपशेल पाठ फिरविली. निवडणूक प्रचारात सर्वात मोठे आकर्षण आहे ते पंतप्रधान नरेंद मोदी यांचे. मोदी यांनी अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे सभा घेतल्या, मात्र अकोल्यात आले नाहीत. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी वाशिम येथे सभा घेतली. काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी बुलडाणा येथे सभा घेतली. तसेच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी अमरावतीत सभा घेतली; मात्र त्यांच्या सभा अकोला जिल्ह्यात झाल्या नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही सभा झाली नाही. बाळापूर येथे शिवसंग्रामचा उमेदवार असतानाही, विनायक मेटेंनी एकही सभा घेतली नाही. त्यामुळे नेत्यांनी उमेदवारांना वार्यावर सोडल्यासारखी गत झाली. जिल्ह्यात शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे वगळता एकाही मोठय़ा नेत्याची सभा झाली नाही. बाळापूर, मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातही एकाही मोठय़ा नेत्याची सभा झाली नाही.